वेल्हे: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी गुरुवारी (दि. 1) लाखोंचा जनसागर लोटला होता. या वेळी जिल्हा परिषद व हवेली तालुका पंचायत समितीच्या वतीने सुसज्ज आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली होती. या यंत्रणेच्या तत्परतेमुळे अत्यावस्थ 115 रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार तसेच इतर अधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा येथील कार्यस्थळावर पाच दिवस तळ ठोकला होता.
पंचायत समित्या, आरोग्य व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेरणे, कोरेगाव भीमा जयस्तंभ स्थळांवर आठ-दहा बैठक झाल्या होत्या. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तत्पर आरोग्य सेवेचे नियोजन केले.
विजयस्तंभाच्या जवळ तीन बेडच्या अतिदक्षता विभागासह मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, कार्यक्रम स्थळ, प्रवासी थांबे, वाहनतळ आदी ठिकाणी आरोग्य पथके सज्ज करण्यात आली. तब्बल 136 वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरसह 800 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
33 रुग्णवाहिका व 20 फिरते मोबाईल व्हॅन कार्यक्रमस्थळी सज्ज होत्या. आपत्कालीन प्रसंगासाठी 9 खासगी रुणालयात 121 बेड आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळेच या कार्यक्रमातील अत्यावस्थ नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कमी कालावधीत विजयस्तंभाच्या जवळ उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात 110 रुग्णांना तातडीची व 5 रुग्णांवर उपचार करून पुढे पाठवण्यात आले. मोबाईल व्हॅन व आरोग्य बुथवर 6 हजार 268 रुग्णांवर उपचार करण्यात आले. मोठा जनसमुदाय असतानाही नियोजनबद्ध आरोग्य सेवेमुळे एकही मृत्यू झाला नाहीमहेश वाघमारे, विस्तार अधिकारी, हवेली