पुणे: आर्थिक वादातून 52 वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घालून खून करणार्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. अभय कदम (वय 24) व बादल शेरकर (वय 24) अशी त्यांची नावे आहेत.
कोंढव्यातील पारशी मैदान परिसरात ही घटना घडली. सुभाष परदेशी (वय 52) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी हेमलता परदेशी (वय 45) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि परदेशी यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाले होते. परदेशी यांनी उर्वरित पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला होता. आरोपी कदम आणि शेरकर यांनी परदेशी यांना कोंढव्यातील ज्योती हॉटेलजवळील मैदानात बोलावून घेतले.
तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी परदेशी यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.