

पुणे: लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकरी वर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली. बाजारात येत असलेल्या लिबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने तसेच ती कच्ची असल्याने त्याच्या खरेदीकडे पुणेकरांनी पाठ फिरविली. परिणामी, लिंबाच्या भावात 15 ते 20 किलोच्या गोणीमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयांना सहा ते आठ लिंबाची विक्री सुरू आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडीमधील फळबाजारात दररोज सुमारे दोन ते अडीच हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक भागातून आवक घटल्यानंतर चेन्नई आणि हैदराबादमधून आवक सुरू झाली होती. (Latest Pune News)
ही आवकही आता घटली आहे. त्या भागातून दररोज अवघी 200 ते 300 गोणी आवक होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भागातील शेतकर्यांकडून वेळेआधीच तोडणी करून हिरव्या रंगाचे कच्चे लिंबू बाजारात पाठविण्यात येत आहेत. या लिंबाला नेहमीपेक्षा कमी भाव मिळत आहे.
सध्या बाजारात लिंबाच्या गोणीला दर्जानुसार 200 ते एक हजार रुपये भाव मिळत आहे. गोणीमध्ये 18 ते 20 किलो माल असतो. मागणी घटल्यास भावात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाच्या चटक्यामुळे लिंबाला मागणी वाढून त्याच्या दरात वाढ झाली होती. मागील काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊसही हजेरी लावत आहे. येत्या काळात लिंबाना मागणी कमी होऊन दर घटतील या शक्यतेने जून, जुलै महिन्यात परिपक्व होणार्या लिंबाची तोडणी आताच होत आहे. परिणामी, या लिंबाला बाजारात कमी मागणी आहे. आता लिंबाची तोडणी झाल्यास पुढील महिना ते दोन महिन्यांच्या कालावधीत लिंबाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दर्जाहिन लिंबाला भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी वेळेआधी लिंबाची तोडणी करू नये.
- रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी, मार्केट यार्ड.