Shadu Ganesh idols Kondhwa
कोंढवा: कारागिरांचा हात जसजसा शाडू मातीवरून फिरत आहे, तसतशा बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्ती आकार घेत आहेत. गणेशोत्सव जवळ येऊ लागल्याने कोंढवा खुर्द येथील कारखान्यात कारागीर तहान-भूक हरपूून गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
27 ऑगस्टला लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. यावर्षी शासनाने पीओपीवरील बंदी उठविल्यामुळे अनेक कारखान्यांमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती पाहायला मिळत आहेत. मात्र, कोंढवा खुर्दमधील पांडुरंग लोणकर यांच्या कारखान्यात शाडू मातीच्या व पीओपीच्या गणेश मूर्ती आकार घेताना दिसत आहेत. (Latest Pune News)
वेगवेगळ्या रूपातील देखण्या मूर्ती येथे पाहायला मिळतात. त्यामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री संत बाळूमामा यांच्या रूपातील गणेश मूर्तींना जास्त मागणी असल्याचे कारागीर अजय बुलबुले यांनी सांगितले.
यावर्षी कोंढव्याचा राजा नवशक्ती तरुण मंडळ 50 वर्षे पूर्ण करत आहे. यामुळे या मंडळातील 50 सभासदांनी शाडू मातीतील कोंढव्याच्या राजाची गणेश मूर्ती घरी बसविण्याचा संकल्प केला आहे. यामुळे येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.
आराशीचे साहित्य ठेवणारी दुकाने शांत
शासनाने प्लास्टिक फुलांवर बंदी घातल्यामुळे, महिनाभर अगोदर आरास करणारी दुकाने थाटलेली पाहायला मिळत होती. गल्लोगल्ली प्लास्टिक फुले, चौकटीची तोरणे, हार व वस्तू विकणारे हातगाडीवरचे विक्रेते फिरताना दिसत होते. मात्र, या वस्तूंवर बंदी आल्यामुळे आराशीचे साहित्य ठेवणारी दुकाने शांत असलेली पाहायला मिळत आहेत.
दरवर्षी बाप्पांचे आगमन होण्यापूर्वी माती, पीओपी, रंग व लागणार्या विविध साहित्यांची दरवाढ होतच आली आहे. महागाई वाढतच आहे. मात्र, पहिल्यापासून बाप्पांची मूर्ती बनवण्यात मला वेगळाच आनंद मिळतो. मी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर काम करत आहे.पांडुरंग लोणकर, कारागीर