पुणे : आज सोमवारी होणाऱ्या कोजागरी पौर्णिमेसाठी दुधाला ग्राहकांकडून राहणारी वाढती मागणी विचारात घेऊन मुबलक दूध पुरवठ्याचे नियोजन केले आहे. तर गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटरला 58 रुपये असून त्यामध्ये कोणतीही वाढ केली नसल्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज दूध) व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.(Latest Pune News)
कात्रज संघाचे रोजचे दूध संकलन दोन लाख लिटरइतके आहे. तर पाऊच पॅकिंगमधील विक्री सव्वालाख लिटरहून अधिक राहते. कोजागरी पौर्णिमेमुळे ग्राहकांच्या दूध खरेदीसाठी रांगा लागतात आणि नेहमीच्या तुलनेत 35 ते 40 हजार लिटरइतक्या दुधाची जादा विक्री होते. त्यादृष्टीने मागील दोन दिवसांपासून राहणारी जादा मागणी विचारात घेऊन दुधाची साठवणूक केली आहे.
त्यामुळे गायीच्या दूध खरेदीसाठी मागणी वाढली तरी मुबलक पुरवठ्याचे नियोजन संघाने केले आहे. कोजागरीमुळे सोमवारी (दि.6) आणि मंगळवारी (दि.7) सलग दोन दिवस जादा मागणीचा अंदाज आहे. गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा दर लिटरला 58 रुपये कायम ठेवण्यात आला असून ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. तसेच, दुधाबरोबरच कात्रजच्या दर्जेदार उपपदार्थांच्या खरेदीसही प्राधान्य देण्याचे आवाहन लिमये यांनी केले आहे.
दरम्यान, गणेश पेठ दूध भट्टी बाजारात म्हशीच्या दुधाची सोमवारी मोठी आवक अपेक्षित आहे. पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे दुधाच्या खरेदीसाठी होणाऱ्या चढाओढीनुसार दरपातळी उच्चांकी राहणार की, आहे तेच भाव स्थिरावणार हे चित्र सोमवारी (दि.6) सकाळी स्पष्ट होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.