पुणे : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रबिंब पूर्ण दिसेल, असे वातावरण तयार झाले आहे. राज्यातील पाऊस उद्या रविवार (दि.5 ऑक्टोबर) पासूनच थांबत असून, सर्वत्र कोरडे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे सोमवारी (दि.6) कोजागरी पौर्णिमेला पूर्ण चंद्रबिंब दिसेल.(Latest Pune News)
यंदा दसऱ्यापर्यंत पाऊस होता. मान्सून गुजरातमध्ये अडखळल्याने कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रांचे दर्शन होते की नाही याची साशंकता होती, मात्र आता ती दूर झाली आहे. कारण गत काही तासांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातून पाऊस पूर्ण कमी झाला आहे. फक्त 4 व 5 रोजी विदर्भात पावसाचा अंदाज आहे, तर 6 पासून संपूर्ण राज्यात कोरडे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे कोजागरीला केशराचे दूध घराच्या गच्चीवरून चांदोमामाला दाखविण्याचा आनंद लुटता येणार आहे.
दसरा सण पार पडताच देवीच्या मंदिराचे दरवाजे बंद होतात. ते कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी उघडतात. या दिवशी दिवाळीची सुरुवात होते, तसेच देवीची पूजा पुन्हा सुरू होते. त्यामुळे घरात, अपार्टमेंटसह वार्डा-वार्डात रस्त्यांवर मोठ्या उत्साहाने हा दिवस तरुणाई साजरा करते. यंदा नवरात्रभर पावसाचे सावट होते. मात्र कोजागरीला ते राहणार नसल्याने हा दिवस तरुणाईला उत्साहाने साजरा करता येणार आहे.