आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आकुर्डी येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात एका बालकाचा अपहरणाचा डाव त्याचाच मित्राच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला. ही घटना आकुर्डीतील एका उद्यानात घडली. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून, उद्यानात येणार्या नागरिकांची तसेच या ठिकाणी खेळण्यास येणारी बालके असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही घटना आकुर्डी येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात गेल्या आठवड्यात घडली. सायंकाळी एक 11 वर्षाचा व 10 वर्षे वयाचे दोन बालके खेळण्यासाठी आली होती. ती दोघे खेळण्यात दंग असताना अचानक एक रांगडा व्यक्ती अकरा वर्षाच्या बालकास उचलून, त्याचे तोंड दाबून घेऊन जावू लागला.
त्या वेळी त्याच्या मित्राने प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीला प्रतिकार करण्यास सुरुवात केली; मात्र त्या अज्ञात व्यक्तीने या छोट्याला ढकलून दिले. आपल्या या प्रतिकाराचा काही फायदा होत नसल्याचे लक्षात येताच त्याने उद्यानात व्यायामासाठी आलेल्या एका व्यक्तीस या घटनेबद्दल सांगितले. व्यायामास आलेल्या व्यक्तीनेही घटनेचे गांभीर्य ओळखत बालकाला पळविण्याचा प्रयत्नात असलेल्या व्यक्तीस जोराचा ठोसा मारून खाली पाडले; तसेच त्या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयन केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
आकुर्डी येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुमारे 12 एकर क्षेत्रात व्यापले आहे. एवढे मोठे उद्यान असूनही येथे एकही सीसीटीव्ही नाही. यामुळे येथे गैरप्रकार करण्याचे धाडस गुंडप्रवृत्तीचे लोकांकडून होत आहे. अर्णवचे आजोबा यांच्यासोबतच उद्यानात येणार्या नागरिकांनीही सीसीटीव्हीची मागणी केली आहे.
या उद्यानात एकच वॉचमन आहे तोही फक्त उद्यान उघडणे व बंद करणे यापलीकडे काही काम करत नाही. उद्यानात येणार्या नागरिक व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी एका वॉचमनची गरज असून, या वॉचमनने उद्यानात सतत गस्त घालावी, अशी मागणी येथे येणार्या नागरिकांतून केली जात आहे. विशेषत: ज्या ठिकाणी खेळणी आहे, त्याठिकाणी त्यांचे लक्ष हवे.
उद्यानात येताना पालकांनीही आपल्या मुलांजवळच बसावे. त्यांना सोडून व्यायामाला जाऊ नये. त्यांची काळजी घ्यावी. जॉगिग किवा मार्निंग वॉक करताना त्यांच्याकडे लक्ष द्यावे.
मुलाचे अपहरण करणार्या व्यक्तीकडे हत्यार व मिरची पूड होती; मात्र क्षणाचाही विचार न करता मी त्याला ठोसा मारून पाडले; मात्र ती व्यक्ती पळून गेली.
– तात्यासाहेब जाधव, नागरिक
(नाव बदललेले आहे)माझ्या मित्राला घेऊन जाताना मी घाबरलो होतो, जोरजोरात ओरडलो; मात्र जवळ कोणीच नव्हते. तेव्हा काही अंतरावर एक काका मला दिसले. मी धावत त्यांच्याकडे गेलो व सदर प्रसंग त्यांना सांगितला. त्यांनीही लगेच मदत केली.
– बालकाचा मित्र
हेही वाचा