Kidnapping Case
शेअर ब्रोकरचे अपहरण, १ कोटीची खंडणी File Case
पुणे

Kidnapping Case| शेअर ब्रोकरचे अपहरण, १ कोटीची खंडणी

पुढारी वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी पुण्यातील शेअर मार्केटमध्ये ब्रोकरचे काम करणाऱ्या एका व्यक्तीचे त्याच्याच कारमध्ये तिघांनी अपहरण केले. संगमवाडी परिसरातून ब्रोकरचे अपहरण करून आरोपींनी थेट अमरावती गाठली.

त्यानंतर १ कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी ब्रोकरच्या मावस भावाने दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरातून एका इसमाचे अपहरण झाल्याची माहिती समजताच पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

गुन्हा दाखल होताच, तत्काळ अमरावती ग्रामीण पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना पकडण्यात आले. नितीन भास्कर सरोदे असे अपहरण करण्यात आलेल्या ब्रोकरचे नाव आहे. तर डॉ. सुहास भांबुरकर, अल्पेश गुडदे आणि भूषण तायडे (सर्व रा. अमरावती) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सरोदे यांचे मावस भाऊ संदीप अशोक भोळे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदे यांच्या माध्यमातून आरोपींनी ५० लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. यात त्यांचा तोटा झाला. या तोट्याला सरोदे हेच जबाबदार असल्याचे सांगत आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची करण्यास सुरुवात केली.

परंतु, पैसे मिळणार नसल्याचे लक्षात येताच सोमवारी (दि. १५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास संगमवाडी पार्किंग नं. १ येथे नितीन सरोदे यांना आरोपींनी भेटण्यासाठी बोलवले. सरोदे भेटण्यासाठी आले असता, त्यांच्याच चारचाकी (एमएच १४ जेएम ८६७०) मधून आरोपींनी मानेवर व पोटावर चाकून लावत सरोदे यांना धाक दाखवला. त्यानंतर त्यांना अमरावती जिल्ह्यात घेऊन गेले.

तेथे गेल्यावर आरोपींनी सरोदे यांच्या नातेवाइकांना संपर्क साधत १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे दिले नाही तर मारून टाकू, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर लगेचच उपायुक्त विजयकुमार मगर यांनी अमरावती पोलिसांशी संपर्क साधत आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश देत, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक अमर कदम हे करत आहेत. अपहरण झाल्याच्या व्यक्तीची सुटका करण्याबरोबरच तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात पथ्रोट पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

SCROLL FOR NEXT