खोर: खोर (ता. दौंड) येथे शुक्रवारी (दि. 13) यात्रेनिमित्त जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा हा आखाड्याचे तब्बल 92 देशांत थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी ग््राामस्थांनी दोन हजार आसनक्षमतेचे भव्य श्री काळभैरवनाथ कुस्ती मैदान उभारले आहे.
खोरमधील कुस्ती मैदानाची उभारणी ही कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या आखाड्यात आधुनिक तंत्रज्ञान सुविधा, प्रेक्षकांसाठी सुसज्ज आसनव्यवस्था आणि पारंपरिक आखाड्याचा साज यांचा संगम साधण्यात आला आहे. तसेच, या आखाड्यात हलगीवादक राजू आवळे यांची वादनकला प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे.
या आखाड्यात 2022 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेले पैलवान पृथ्वीराज पाटील यांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी उपस्थिती लावून मैदान गाजविले होते.
खोर यात्रेतील कुस्ती आखाडा ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून गावच्या एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. राजकीय गट-तट विसरून संपूर्ण गाव दरवर्षी या आयोजनासाठी एकत्र येते. नियोजन, आर्थिक सहभाग, मैदान उभारणीपासून पाहुणचारापर्यंत प्रत्येक कामात ग््राामस्थांची सक्रिय भूमिका असते.
परदेशातील कुस्तीप्रेमींना मेजवानी
या आखाड्याची संकल्पना प्रसिद्ध कुस्ती निवेदक पै. सागर चौधरी यांची असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आकारास आला आहे. आखाड्याच्या 92 देशांत लाइव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी ज्ञानेश्वर असवाले यांच्याकडे आहे. ग््राामीण भागातील एका यात्रेतील कुस्ती आखाडा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार असल्याने खोर ग््राामस्थांमध्ये उत्साह आहे. परदेशातील मराठी बांधवांसह कुस्तीप्रेमींनाही हा थरार अनुभवता येणार आहे.