Khelo India Youth Games 2025 Maharashtra double medal blast in yoga
पुणे : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील योगासन स्पर्धेत रविवारी धडाकेबाज सुरूवात केली. रिदमिक योगासन पेअरमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या आणि मुलींच्या गटात सुवर्ण अन् रौप्यपदके जिंकून निर्विवात वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी चार पदके जिंकून आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली.
मुलांच्या रिदमिक योगासन पेअर स्पर्धेत रोहन तायडे-अंश मयेकर आणि प्रणव साहू-अर्यन खरात या महाराष्ट्रीयन जोड्यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदक विजेत्या रोहन-अंश जोडीने 129.50 गुणांची, तर रौप्यदपक विजेत्या प्रणव-अर्यन जोडीने 129.20 गुणांची कमाई केली. सरांश कुमार व अभिषेक कुमार या बिहारच्या जोडीने 127.37 गुणांसह कांस्यपदक जिंकले. मुलींच्या रिदमिक योगासन पेअर स्पर्धेत रुद्राक्षी बावे व प्रांजळ व्हान्ना या महाराष्ट्राच्या जोडीने 131.19 गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. तृप्ती डोंगरे व देवांशी वाकले या जोडीने 130.44 गुणांसह रौप्यपदक जिंकले. स्पृहा कश्यप व भाबना बोरा या आसामच्या जोडीने 127.26 गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली.
महाराष्ट्राला आज दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके जिंकून देणारे खेळाडू हे संगमनेर येथील धृव ग्लोबल स्कूलचे खेळाडू आहेत. मंगेश खोपकर, विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व अमृता चिनकर हे त्यांचे प्रशिक्षक होत. खेलो इंडिया स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्येच या खेळाडूंचे 8 दिवशीय सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते. या सराव शिबिराचाही खेळाडूंना फार फायदा झाला, अशी माहिती मुलांच्या संघाचे प्रशिक्षक स्वप्निल जाधव यांनी दिली.