Khelo India Mallakhamb Competition Pudhari
पुणे

Khelo India Mallakhamb Competition: खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेचे नियोजन कोलमडले; बालेवाडीत खेळाडूंची पाच तास प्रतीक्षा

सकाळी ९ वाजताची स्पर्धा दुपारी २ वाजेपर्यंत सुरूच नाही; खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचा क्रीडा प्रशासनावर संताप

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: पुण्यातील क्रीडापंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’मधील मल्लखांब स्पर्धेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांच्या तीव्र संतापामुळे क्रीडा प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्या वर आला आहे.

म्‍हाळुंगे-बालेवाडी येथे ८ व्या खेलो इंडिया युथ गेम्स (तेलंगणा-२०२६) मल्लखांब स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी दि. १७ नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. १७ नोव्हेंबरला मुलांची, तर १८ नोव्हेंबर रोजी मुलींची निवड चाचणी सकाळी ९ वाजता होणार आहे. यात वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांतून उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजता सुरू होणारी मल्लखांब स्पर्धा दुपारी २ वाजत आले तरी सुरू न झाल्याने मोठा गोंधळ उडाला.

राज्यभरातून आलेल्या मल्लखांबपटूंना सकाळी नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी बोलावण्यात आले होते. खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून संपूर्ण वॉर्म-अप आणि मानसिक तयारी केली होती. मात्र, तांत्रिक अडचणी, पंचांची अनुपस्थिती किंवा साहित्याची कमतरता यांसारख्या क्षुल्लक कारणांमुळे स्पर्धा वेळेत सुरू होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, दुपारी दोन वाजत आले तरी स्पर्धा सुरू होण्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याची तक्रार काही खेळाडू आणि पालकांनी केली आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

‘खेलो इंडिया’सारख्या राष्ट्रीय आणि मानाच्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारचा विसंवाद आणि नियोजनशून्यता असणे अत्यंत दुर्दैवी आहे. लांबवरून आलेल्या खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना ताटकळत राहावे लागले. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे खेळाडूंचे मनोधैर्य खचत असून, क्रीडा प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालक व क्रीडाप्रेमींकडून होत आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स (तेलंगणा-२०२६) मल्लखांब स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड चाचणीचे बालेवाडीत आयोजन करण्यात आले होते. खेळाडूं, प्रशिक्षक, पंच आणि इतर नियोजनामुळे या स्‍पर्धा वेळेत सुरू करता आल्या नाहीत.
डॉ. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT