पुणे

खेडला सह्याद्रीच्या डोंगररांगांत फुलोत्सव

Laxman Dhenge

वाडा : पुढारी वृत्तसेवा : वसंत ऋतूच्या आगमनामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगा विविध रंगबिरंगी फुलांनी बहरल्या आहेत. पळस, गुलमोहर, काटेसावर, गिरीपुष्प आदी झाडांना बहर आला आहे. जणूकाही फुलांचा रंगोत्सव येथे सुरू झाला आहे. पर्यटकदेखील हा रंगोत्सव पाहण्यासाठी आवर्जून येथे थांबत आहेत. फुलांनी बहरलेली झाडे अनेक पशुपक्ष्यांना खाद्य व आश्रय देतात. त्यामुळे येथे विविध पक्ष्यांचा किलबिलाट पाहावयास मिळतो. अनेक वृक्ष आकर्षक फुलांनी बहरले आहेत. निसर्ग व पक्षी अभ्यासकांना ही पर्वणी आहे. निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येत आहेत.

फ्लेम ऑफ द फायर पळस
फ्लेम ऑफ द फायर म्हणून ज्याचे वर्णन केले जाते त्या पळसाची लाल व भगवी फुले खूप बहरली आहेत. डोंगराळ भाग, रस्त्याच्या कडेला आणि शेतांच्या बांधावरील पळसाच्या झाडावर आलेली ही भडक लाल भगव्या रंगाची फुले जणुकाही रंगोत्सव साजरा करत असल्याप्रमाणे भासत आहेत.

मखमली पाकळ्यांचा पांगारा

फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगार्‍याची फुले फुलतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणार्‍या पाकळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आयुर्वेदात पांगार्‍याला फार महत्त्वाचे स्थान आहे. याची साल व पाने औषधी गुणधर्मयुक्त आहेत.

आकर्षक बेशरमचे फूल

औषधी गुणधर्मांसाठी बेशरम वनस्पती प्रसिद्ध आहे. अनोख्या नावाने त्याला लोकप्रियता दिली आहे. कोरड्या हवामानातही ही वनस्पती चांगली येते. पाने आणि फुले विविध आयुर्वेदिक औषधी उपायांमध्ये वापरली जातात.

भरगच्च बहरलेले गिरीपुष्प

गिरीपुष्प याला ग्लिरिसिडिया असे नाव आहे. हा पानझडी वृक्ष असल्यामुळे पाने गळून गेल्यानंतर फांद्यांच्या टोकांवर निळी जांभळी फुले गुच्छात येतात. फुलांनी बहरलेले गिरीपुष्प झाड फार सुंदर दिसते. या झाडाची फुले शोभेसाठी वापरली जातात. या झाडांच्या बिया उंदरांनी खाल्यास उंदीर मरतात. या झाडांच्या हिरव्या पानांपासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.

लक्षवेधी काटेसावर

संपूर्ण काट्याने मढलेली असल्याने हिला मराठीत काटेसावर म्हणतात. तर संस्कृतात शाल्मली असे नाव आहे. काटेसावरीची फुले मोठी, पाच पाकळ्या, पाकळ्या जाड आणि रंग गडद गुलाबी, खूप सारे पुंकेसर असलेले असतात. या फुलांना खाण्यासाठी खारुताई जमा होतात. तर फुलांमधून मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT