रस्त्यावरील खड्ड्यात टेबल टाकून ग्रामस्थांनी उघडल चहापानाचा हॉटेल; खेड तालुक्यात खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन  Pudhari
पुणे

Pune News: रस्त्यावरील खड्ड्यात टेबल टाकून ग्रामस्थांनी उघडल चहापानाचा हॉटेल; खेड तालुक्यात खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

रविवारी (दि. २१) या रस्त्यावरील खड्ड्यात टेबल टाकून चहापान सुरू करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

खेड: राजगुरुनगर ते भीमाशंकर मार्गावरील सातकरस्थळ येथील वाडा रस्त्यावर खड्ड्यांच्या समस्येमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. रविवारी (दि. २१) या रस्त्यावरील खड्ड्यात टेबल टाकून चहापान सुरू करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला आहे.

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या घराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असताना, या आंदोलनाने राजगुरुनगर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. (Latest Pune News)

हा रस्ता राजगुरुनगर ते भीमाशंकर मार्गाचा भाग असून, पश्चिम भागातील ५०हून अधिक गावे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला जाणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. मात्र, पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, राजगुरुनगर आणि सातकरस्थळ परिसरात त्यांची संख्या आणि खोली अधिक आहे.

गावाचे सरपंच ऋतिका सातकर, माजी सरपंच अजय चव्हाण आणि सहकाऱ्यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला, परंतु दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे, विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करणारे आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे या रस्त्याकडे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांना सामोरे जावे लागणाऱ्या नागरिकांनी अखेर संताप व्यक्त करत थेट खड्ड्यात टेबल टाकून चहापान सुरू केले.या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, अजय चव्हाण, आकाश सातकर, अभिजीत सातकर, साहेबराव सातकर, विकास थिगळे, पांडुरंग आरुडे, योगेश कोहिनकर, सुनील बलदोटा, बाबासाहेब कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.

“रस्त्याची दुरुस्ती होत नाही, म्हणून आम्ही खड्ड्यातच ‘हॉटेल’ उघडले,” अशी उपरोधिक टिप्पणी आंदोलकांनी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या असताना, हे आंदोलन राजकीय दृष्टिकोनातूनही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनामुळे रस्ते दुरुस्तीच्या मागणीला बळ मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

“रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत आम्ही असे अनोखे आंदोलन करत राहू. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आता तरी जबाबदारी घ्यावी,” असे सरपंच ऋतिका सातकर यांनी सांगितले. आता या आंदोलनानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT