खेड: कुरुळी-आळंदी ग्रामीण गटात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची कन्या तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मागील विधानसभेचे दावेदार सुधीर मुंगसे यांच्या पत्नी विनयाताई मुंगसे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित मानली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदिराताई नीलेश थिगळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजाताई लांडगे इच्छुक आहेत. ही उमेदवारी पक्की आहे की नाही याबाबत मतदारसंघात संभम निर्माण झाला आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील गवारी यादेखील भाजपच्या माध्यमातून रिंगणात येणार आहेत. (Latest Pune News)
पाईट-आंबेठाणची खलबते चर्चेत
पाईट-आंबेठाण सर्वसाधारण महिला आरक्षण आले असून, येथील राजकीय खलबते तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या विचारांचे मतदान येथे आहे. महिला आरक्षण आल्याने त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील उमेदवार असतील. स्वतःसाठी किंवा आदिवासी जागा येऊन सुद्धा सलग चार वेळा शरद बुट्टे पाटील यांना या मतदारसंघाने साथ दिली आहे; मात्र या वेळी गटातील नव्या गावांच्या सहभागाने राजकीय गणित बदलले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दोन वेळा विधानसभा निवडणुकीत इच्छुक राहिलेले अतुल देशमुख यांनी मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची निर्णायक जुळवाजुळव केली आहे. त्यांच्या पत्नी कल्पनाताई देशमुख यांच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात.
याशिवाय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि खेड तालुक्याचे माजी आमदार दिवंगत ॲड. साहेबराव बुट्टे पाटील यांच्या सूनबाई तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या पत्नी ॲड. राजमाला बुट्टे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे यांच्या पत्नी प्राचीताई लिंभोरे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. लिंभोरे हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत; मात्र नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते विरोधकांच्या पंगतीत बसले आहेत. शरद बुट्टे पाटील यांना रोखण्यासाठी सगळे विरोधक प्रत्यक्ष निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
नाणेकरवाडी-म्हाळुंगे
नाणेकरवाडी-म्हाळुंगे सर्वसाधारण जागेसाठी आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, भाजपकडून संदीप सोमवंशी, मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडीचे माजी सरपंच जीवन खराबी आणि उद्योजक गणेश बोत्रे जनसंपर्कात आहेत.
काळूस-मेदनकरवाडी
काळूस-मेदनकरवाडी गटात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दिलीप मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाजार समितीचे संचालक विनोद ऊर्फ पप्पू टोपे, माजी सभापती विनायक घुमटकर पैकी एक आणि आमदार बाबाजी काळे यांच्या शिवसेनेकडून गणेश आरगडे यांच्यात सरळ सामना होणार आहे. याशिवाय राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांनी येथून लढावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याची कुजबुज सुरू आहे.