राजगुरुनगर : जिल्ह्यात गट-गणांच्या फेररचनेत सर्वाधिक तोडफोड खेड तालुक्यात झाल्याची बातमी दै. ‘पुढारी’ने दिली होती. यामुळेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक हरकतीदेखील याच तालुक्यात दाखल झाल्या आहेत. खेड तालुक्यात 8 गट व 16 गण झाले असून, यावर तब्बल 87 हरकती दाखल झाल्या आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना दाखल केल्या असल्या, तरी अनेक इच्छुक उमेदवार या गट-गणाच्या तोडफोडीविरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या खंडानंतर होत आहेत. जिल्ह्यात व तालुक्यात नेतृत्व करण्याची ही मोठी संधी असल्याने खेड तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात जुन्नर, खेड, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गट नव्याने वाढले आहेत. जिल्ह्यात नव्याने गट वाढले किंवा ज्या तालुक्यात गटसंख्या कमी झाली त्या ठिकाणी फारसे फेरबदल झालेले नाहीत. परंतु खेड तालुक्यात नव्याने एक गट तयार करण्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व गट-गणांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. अनेक ठिकाणी काही लोकांच्या सोयीसाठी भौगोलिक सलगता न राखता गटाचे अंतर, क्षेत्रफळ कशाचाही विचार न करता ही तोडफोड करण्यात आली. काही ठराविक गावे पूर्वी गटातून जाणीवपूर्वक उचलून दुसऱ्याच गटात टाकण्यात आली आहेत. यामुळेच खेड तालुक्यात सर्वाधिक 87 हरकती दाखल झाल्या आहेत.
नवीन गट-गणरचनेत भविष्यातील आरक्षण कोणते पडू शकते यासाठी ठरावीक मोठी गावे या गटातून त्या गटात टाकण्यात आली आहेत. यामुळे सध्या ज्या लोकांना आपल्यासाठी अमुक गट, गण चांगला झाल्याचे वाटत असेल तर आरक्षण सोडतीनंतर त्याच्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते. तहसीलदारांनी केलेली ही गट-गणरचना काहींच्या मात्र पथ्यावर पडणार आहे. परंतु ही गट-गणरचना करताना तहसीलदार यांना तालुक्यातील काही अर्थपूर्ण गुरू भेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत रेटवडी- वाफगाव, पिंपळगाव-मरकळ, काळूस-पाईट आणि महाळुंगे-आंबेगाव या चार गटांच्या भोवतीच आता राजकारण फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच काळूस आणि महाळुंगे गटावर सर्वाधिक 42 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतीची दखल घेऊन काही बदल होऊ शकतात. तालुक्यातील राजकारण निमगाव गावाभोवती तर फिरत नाही ना, अशीदेखील चर्चा यामुळे सुरू आहे. आता रेटवडी गटातील निमगाववरील हरकतीनंतर थेट काळूसला तर जोडले जाणार नाही ना, अशीदेखील चर्चा तालुक्यात सुरू आहे.