Fake Police Robbery Pudhari
पुणे

Khed Shivapur Police Chowki Cash Case: खेड शिवापूर पोलिस चौकीत २० लाखांच्या रोकड प्रकरणाचा पर्दाफाश; महिला हवालदार व तोतया पत्रकारावर संशय

व्यावसायिकाकडील रोकड लुटीचा प्रयत्न; वरिष्ठ निरीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर प्रकार उघडकीस, नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कारमधून व्यावसायिकाला खेड शिवापूर पोलिस चौकीत घेऊन आल्यानंतर महिला पोलिस हवालादाराने तोतया पत्रकाराच्या साथीने बॅगेतील २० लाख रुपये काढून घेतल्याचे समजते. साडेसहा लाख रुपये मुद्देमालात दाखविण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, हा प्रकार राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावर पडताच त्यांनी थेट खेड शिवापूर पोलिस चौकी गाठली अन्‌ पैशांच्या फेकाफेकीमुळे पाऊसच पडला आणि सर्व बिंग फुटले. एवढेच नाही तर या महिला पोलिस हवालादारांनी झालेल्या प्रकरणाची कोठे वाच्यता होऊ नये, तसेच वरिष्ठांना आपला अहवाल पाठवू नये म्हणून जाधव यांच्यावर देखील काही जणांकडून दबाव आणल्याची माहिती आहे.

याबाबत वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाच्या बॅगेतून काढलेली रोकड तोतया पत्रकाराने आपल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. खेड शिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र, त्यांच्या या कृत्याचा सर्व प्रकार समोरील एका हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे अनेक सवाल ‍उपस्थित केले जाऊ लागले आहेत. शनिवारी (दि.१८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर पोलिस असल्याचे सांगून हर्षवर्धन पवार या व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील विक्रम विलास चाकणकर, अमेय अरविंद कार्ले, गणेश रमेश कदम या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, यातील कार्ले आणि तोतया पत्रकार एकाच इमारतीत वास्‍तव्‍यास असल्‍याचे समजते.

ड्युटी संपल्यानंतर देखील कर्तव्यावर?

या महिला पोलिस हवालादारांनी घटनेच्या आदल्या दिवशी चोवीस तास कर्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी नियमानुसार सुटी होती. परंतु, असे असताना देखील या महिला पोलिस हवालदार चौकीला न बसता समोरील एका डोसा विक्री करणाऱ्या हॉटलेमध्ये दुपारपर्यंत बसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज राजगड पोलिसांनी जमा केले आहे.

पोक्सोचा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न

या महिला पोलिस हवालदारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस चौकीत आलेल्या बाललैंगिक अत्याचाराची तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस निरीक्षक जाधव हे त्या दिवशी चौकीला आले होते. त्यांना तक्रारदार समोर दिले. काही तरी वेगळा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत या महिला पोलिस हवालदारांनी तक्रादारांनाच मॅनेज करून अपघाताचा प्रकार असल्याचे सांगायला लावले. परंतु, जाधव यांनी कसून चौकशी केली तेव्हा हा पोक्सोचा प्रकार असल्याचे पुढे आले. या महिला हवालदाराने आपल्या एका पोलिस सहकाऱ्याला देखील हा अपघाताचाच प्रकार असल्याचे पोलिस निरीक्षकांना सांगण्यास लावले होते. या प्रकरणात देखील या हवालदारांचा कसुरी अहवाल जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यावेळी पाठवून दिला होता.

...असे फुटले बिंग

राजगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष जाधव यांना चौकीतील त्या महिला पोलिस हवालादाराच्या वाढीव कामाची अगोदरच माहिती मिळाली होती. जाधव चौकीकडे निघालेच होते. तेवढ्यात या हवालदार महिलेने त्यांना फोन करून 'सर आपण अशी-अशी हवाल्याची रोकड पकडली' असल्याचे सांगितले. जाधव यांनी पोलिस चौकीत दाखल होऊन सर्व घटनेची माहिती घेतली. तेव्हा त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ व्यावसायिकाला चौकीत घेऊन येणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. व्यावसायिकाची रोकड मोजून ती बरोबर असल्याची खात्री केली. त्यानंतर ते स्वतः या सर्वांना घेऊन नऱ्हे पोलिस ठाण्यात दाखल झाले.

हवालदारासाठी स्वतंत्र केबीन

खेडशिवापूर चौकीच्या पाठीमागील बाजूला असलेल्या जागेत या महिला हवालदाराने आपले केबीन बनवले आहे. तेथे बसूनच या हवालदार चौकीचीच नव्हे तर राजगड पोलिस ठाण्यातील कारभार हाकत होत्या म्हणे. परंतु, पोलिस निरीक्षक जाधव यांनी पदभार घेताच त्यांच्या हद्दीबाहेरील कर्तव्यावर चांगल्याच मर्यादा आल्याचे समजते.

सतरा वर्षांपासून एकाच तालुक्यात

खेडशिवापूर पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या या महिला पोलिस हवालदार राजगड तालुक्यात सतरा वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती आहे. तर या चौकीत त्या गेल्या दोन वर्षांपासून नेमणुकीस असल्याचे समजते. त्यांच्या कार्याचा आवाका आणि दरारा मोठा असल्याचे नागरिक सांगतात.

कारच्या हालचाली संदिग्ध

व्यावसायिकाला खेडशिवापूर पोलिस चौकीला घेऊन येणारी कार विक्रम चाकणकर याची आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही कार चौकीला दाखल झाली. ही कार चौकीच्या समोर उभी होती. मात्र, काही वेळाने हीच कार समोरील एका हॉटेलच्या पुढे आली. त्या हॉटलेमध्ये या महिला पोलिस हवालदार बसलेल्या होत्या, असे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT