Khed police action gutkha seizure
खेड : पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या खेड घाटात खेड पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठी कारवाई करत सुमारे ४४ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांडभोरवाडी गावाजवळ तपासणीदरम्यान, टाटा कंटेनर (MH 14 LB 2001) आणि महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 14 LB 4615) या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला वाहतूक करताना आढळला. जप्त केलेल्या मुद्देमालात विविध कंपन्यांचे गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ तसेच दोन वाहने असा एकूण ४४,०९,२०० रुपयांचा माल समाविष्ट आहे.
या प्रकरणी तुषार शांताराम बंदावणे (वय ३८, रा. बंदावणेशिवार, ता. खेड) आणि संदेश राजाराम ढमाले (रा. ढमालेशिवार, ता. खेड) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकअप वाहनाचा चालक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध मोठे यश मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.