Khed illegal mining case Pudhari
पुणे

Khed illegal mining case: अवैध गौणखनिज उत्खननाच्या कारवाईत महसूल पथकाचा रस्ता अडवला; खेडमध्ये गुन्हा दाखल

खेड सिटी परिसरातील घटना; हायवा चालकाने मुरूम टाकून रस्ता अडवल्याचा आरोप, दोन जेसीबी चालक घटनास्थळावरून पसार.

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: खेड तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार प्रशांत बेडसे आणि महसूल विभागाच्या पथकाचा रस्ता हायवाचालकाने मुरूम टाकून अडवल्याची घटना घडली.

तसेच, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पथकाच्या गाड्या रोखल्या, तर उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबीचे चालक पळून गेले. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह महसूल विभागाचे पथक गुरुवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजगुरुनगरहून पाबळ रस्त्याने अवैध उत्खननावर कारवाईसाठी निघाले होते. या पथकात निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, ग्राम महसूल अधिकारी मनीषा जानराव, विजया पाटील, ब्रह्मानंद टाचणे तसेच महसूल सेवक दत्तात्रय चव्हाण, संतोष बोऱ्हाडे आणि सुनील गायकवाड यांचा समावेश होता.

निमगाव हद्दीतील खेड सिटी परिसरात एमएच-१२ वाय-क्यू ७९४६ क्रमांकाचा हायवा कनेरसरकडून खेडच्या दिशेने मुरूम वाहून नेताना पथकाला दिसला. त्यामुळे पथकाने गाड्या वळवून हायवाचा पाठलाग सुरू केला.

त्याचवेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी पथकाच्या गाड्या रोखून, ‘तुम्ही कोण?’ अशी विचारणा केली. तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी स्वतःची ओळख सांगितल्यानंतर ते बाजूला झाले.

पथकाने हायवाचा पाठलाग सुरू ठेवला. रेटवडी येथील कालवा रस्त्यावर सव्वासातच्या सुमारास हायवाचालकाने अचानक वाहनाचा मागील भाग उचलून अंदाजे सहा ब्रास मुरूम रस्त्यावर आणि पथकाच्या गाड्यांच्या दिशेने टाकला. त्यामुळे रस्ता अडला. यानंतर हायवाचालक अंधाराचा फायदा घेत वाहनासह पळून गेला.

त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पथक एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या गट क्रमांक १४८६ येथे पोहचले. तेथे दोन जेसीबीच्या साह्याने उत्खनन सुरू असल्याचे दिसले. पथकाच्या गाड्या दिसताच जेसीबी चालकांनी यंत्रे २०० मीटर अंतरावर उभी करून पलायन केले.

या ठिकाणी अंदाजे २७०० ब्रास मुरमाचे उत्खनन करून चोरी केल्याचे आढळले. घटनास्थळी असलेल्या गणेश साहेबराव हजारे (रा. कनेरसर) यांनी जेसीबी आपले असल्याचे, तर हायवा सुयोग पांडुरंग पानसरे (रा. पाबळ, ता. शिरूर) यांचा असल्याचे सांगितले.

महसूल अधिकारी शीला बाळशीराम शेवाळे (वय ४४, रा. लक्ष्मीनगर, राजगुरुनगर) यांच्या तक्रारीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश हजारे, सुयोग पानसरे, दुचाकीवरील दोन व्यक्ती, हायवाचालक आणि दोन जेसीबीचालकांचा समावेश आहे.

महसूल पथकाच्या कारवाईत अडथळा आणणे आणि रस्त्यावर मुरूम टाकून मार्ग रोखण्याच्या या प्रकाराची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT