खेडला अर्थसंकल्पात निधी नाही; दिलीप मोहिते पाटील यांचा आरोप Pudhari
पुणे

खेडला अर्थसंकल्पात निधी नाही; दिलीप मोहिते पाटील यांचा आरोप

'ते जनतेची दिशाभूल करीत असून, आपल्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेत आहेत'

पुढारी वृत्तसेवा

खेड: यंदाच्या अर्थसंकल्पात खेड तालुक्याला एक पैसाही निधी मिळाला नाही, असा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. सध्याचे आमदार बाबाजी काळे यांच्यावर घणाघाती टीका करताना, ‘ते जनतेची दिशाभूल करीत असून, आपल्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेत आहेत,’ असे मोहिते म्हणाले.

‘खेड तालुक्याला काय मिळाले? आमदार काळे यांनी अर्थसंकल्पात काय मांडले? ते आमच्या कामांचे श्रेय घेतात. पण, नवीन काहीच करीत नाहीत,’ असे मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Latest Pune news)

आमदार बाबाजी काळे यांनी महाराष्ट्रदिनी ध्वजारोहणानंतर सांगितले होते की, प्रशासकीय इमारतीसाठी 38 कोटींचा निधी मिळाला असून, लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगितले. त्याला मोहिते यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, यासाठी आपण प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव मांडला होता.

पंचायत समितीच्या जागेत ही इमारत बांधण्याचे ठरले होते. पण, विरोधकांनी अडथळा आणला. अखेर सध्याच्या पंचायत समितीच्या जागेत इमारत बांधण्याचे निश्चित झाले. 2021 मध्ये याचे टेंडर निघाले, वर्कऑर्डरही झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. मात्र, निवडणुकीत अपयश आले आणि आता काळे माझ्या कामांचे श्रेय घेत आहेत, असे मोहिते यांनी स्पष्ट केले.

आश्वासनांची पूर्तता कधी?

मोहिते यांनी काळे यांच्यावर निवडणुकीतील आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला. ‘निवडणुकीत दिलेली आश्वासने कधी पूर्ण करणार? 52 हजार मतांनी विजय मिळाला म्हणजे विकास होतो का? तालुक्याच्या विकासासाठी ठोस कामे करा, दुसर्‍यावर टीका करून काही होत नाही,’ असे मोहिते यांनी सांगितले.

पार्किंग समस्येवर उपाययोजना

पार्किंगची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि नगरपरिषदेने व्यवस्था करावी. नागरिकांनीही नियम पाळावेत. शहराबाहेरील रस्ते आणि आरबूजवाडीचा पूल पूर्ण झाल्यावर वाहतूक कमी होईल. भविष्यात तहसीलदार कार्यालयाच्या जागेवर वाहनांसाठी मोठी पार्किंग इमारत बांधण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या सुटेल, असे मोहिते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT