खेड-आळंदीत महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण! file photo
पुणे

Maharashtra Assembly Polls: खेड-आळंदीत महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण!

अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

पुढारी वृत्तसेवा

Political News: खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. यामध्ये प्रमुख बंडखोरी महायुतीमध्ये झाली असून, शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व सुधीर मुंगसे या दोघांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत केलेली बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडणार? हे आता माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (दि. 29) अखेरचा दिवस होता. यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरणार? आणि बंडखोर काय करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. महायुतीमध्ये खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याने ही जागा त्यांनाच मिळाली व उमेदवारी देखील दोन महिन्यापूंर्वीच आमदार दिलीप मोहिते पाटील यांना जाहीर झाली.

महायुतीमधील सहकारी घटकपक्ष भाजप व शिंदे शिवसेनेचा पाठिंबा मोहिते पाटील यांनाच असला, तरी पारंपरिक विरोधक म्हणून शिंदे शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

शेवटच्या दिवशी जाधव यांनी शिवस्वराज पक्षात प्रवेश करत नव्याने अर्ज भरला. दरम्यान, महाविकास आघाडीत जागा वाटप व उमेदवारीनिश्चितीचा गोंधळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. खेडसह शिरूर लोकसभेतील सर्वच तालुक्यांतील शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी एकत्र येत शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करत खासदारांनी आपली निवडणूक काढून घेतल्यावर शिवसैनिकांना ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याची प्रचंड टीका सुरू झाली.

यामुळेच अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिवसेनेला (उबाठा) सोडण्यात आली. उबाठा गटाकडून बाबाजी काळे यांना उमेदवारी निश्चित झाली. काळे गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीची तयारी करत असून, अखेर त्यांना उमेदवारी मिळाली देखील व जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला.

परंतु, शरद पवार गटातील नाराज झालेल्या अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शनाने आपला अर्ज दाखल केला. याचसोबत गेले काही महिने तालुक्यात जोरदार हवा केलेले सुधीर मुंगसे यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आता शरद पवार गटाच्या या दोन्ही बंडखोर उमेदवारांचा अर्ज शेवटपर्यंत राहणार की पक्षश्रेष्ठींना बंडखोरी थांबविण्यात यश येणार? यावर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT