पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रवीण चौरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेसमधील नाराज बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. आदिवासी पट्ट्यात दांडगा जनसंपर्क असलेले धीरज अहिरे यांनीही जनतेच्या आग्रहास्तव बंडाचा झेंडा हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
साक्री तालुक्यातील माजी आमदार डी. एस. अहिरे यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य धीरज अहिरे हे शांत, संयमी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. परंतु,आता त्यांनी आक्रमक भुमिका घेतल्याचे चित्र आहे. पश्चिम पट्ट्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नातेगोते असून अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात त्यांचे चांगलेच मोठे प्रस्थ आहे. पक्षाने त्यांना उमदेवारी डावलल्याने त्यांच्यासह समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. धीरज अहिरे यांनी काहीही करुन विधानसभा निवडणुकीत लढवावी,असा आग्रह धरत पश्चिम पट्ट्यातील सर्व आदिवासी लोकांनी त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे धीरज अहिरे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.