येरवडा: खराडी परिरासरातील राजाराम पाटीलनगर, फॉरेस्ट काउंटी सोसायटीच्या गेटसमोरील रस्त्यावर महापालिकेच्या वतीने पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या वेळी जेसीबीच्या धक्का लागल्याने शुक्रवारी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची पाईप लाईन फुटून गॅस गळती झाल्याने जवळच असलेल्या रोहित्रला आग लागली. खराडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत रोहित्र पूर्णपणे जळाले आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमान दलाचे प्रभारी अधिकारी नितीन टेमगिरे यांनी सांगितले. महापालिकेकडून पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास जेसीबीचा धक्का लागल्यामुळे गॅस वाहिनीतून गळती सुरु झाली. (Latest Pune News)
यामुळे लागलेली आग जवळच असलेल्या रोहित्रपर्यंत पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मिळताच खराडी अग्निशमन दलाचे जवान अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अग्निशमन यंत्र आणि ड्राय केमिकल पावडरच्या सहायाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला.
मात्र या आगीत बाजूला असणारे 2200 केव्हीचे रोहित्र जळाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी रोहित्राची आग आटोक्यात आणली. दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा रात्री रात्री उशिरापर्यंत खंडीत होता. तो लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले.