पुणे: खराडी परिसरातील एका बड्या बिल्डराच्या भूखंडावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या माध्यमातून हटविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणे वर्षानुवर्षे महापालिकेला काढता येत नसताना बिल्डरच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावून केलेल्या कारवाईचे बिंग आता फुटले आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने गत आठवड्यात महापौर व उपमहापौर निवडणुकीची लगबग सुरू असताना खराडीतील-बोराटेनगर येथे मोठी कारवाई केली. तब्बल 1 लाख 85 हजार चौरस फूट, अनधिकृत कच्चे-पक्के शेड व बांधकाम यावर ही कारवाई करण्यात आली होती. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, महापालिकेने केलेल्या या कारवाईचे खरे कारण समोर आले आहे.
ज्याठिकाणी प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली, ती कोणत्या रस्त्यावरील अथवा सार्वजनिक जागेवरील नसून शहरातील एका बड्या बिल्डराच्या मालकीची आहे. या जागा संबंधित बिल्डरने विकत घेण्यापूर्वीच त्यावर काही अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे होती. संबंधित बिल्डरला ही ती काढता येत नव्हती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली अन् महापालिकेच्या माध्यमातून मोठा फौजफाटा लावून ही अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र, ही सार्वजनिक जागा नसताना अगदी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या दिवशीच प्रशासनाने ही कारवाई केल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धक्कादायक म्हणजे येथील अतिक्रमणांवर जुन्या नोटिशीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण व बांधकाम विभागात टोलवाटोलवी
खराडी येथील कारवाईबाबत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार कारवाई केल्याचे सांगितले, तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र अतिक्रमण विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार कारवाई केल्याचा दावा केला आहे. कारवाईवरून अतिक्रमण विभाग व बांधकाम विभाग यांच्यात टोलवाटोलवी सुरू झाल्याने कारवाईबाबत संशय आणखीच गडद झाला आहे.
राजकीय मंडळींची बघ्याची भूमिका
एका बिल्डरसाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाची एवढी मोठी यंत्रणा कामाला लागली असताना राजकीय मंडळींनी मात्र बघ्याची भूमिका घेतली असल्याचे चित्र आहे. बिल्डरसाठी केल्या गेलेल्या कारवाईबाबत एकाही लोकप्रतिनिधीने प्रशासनाला जाब विचारण्याचे धाडस दाखविले नसल्याने या सर्वांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खराडीतील ‘भारत माता’ नावाने अनधिकृत मार्केट सुरू असल्याची तक्रार प्रशासनाकडे आली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कोणाची खासगी जागा खाली करून देण्यासाठी कारवाई झाली असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे मनपा