मंचर : खडकी (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडीतील पांडुरंग किसन पाटील यांच्या घराच्या कुंपणाच्या गेटवरून उडी मारून बिबट्या थेट अंगणात शिरला. त्यावेळी अंगणात दोन कुत्रे होते. बिबट्या दिसताच ती कुत्री जोरजोरात भुंकत बिबट्याला दोन्ही बाजूंनी सामोरे गेली. हा प्रतिकार पाहून बिबट्याने अक्षरशः तेथून पळ काढला. कुत्र्यांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना रविवारी (दि. 23) पहाटे सुमारे 5 वाजता घडली.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या भागात बिबट्यांचे दर्शन नवे नाही. अंगणवाडी परिसरातही त्याची नियमित हालचाल दिसते. त्यामुळे महिला, मुले आणि सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पांडुरंग पाटील यांच्या घराच्या अंगणात झालेली ही घटना धोक्याची घंटा मानली जात आहे. संबंधित बिबट्याला पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, पिंजऱ्याबाबत वन विभागाकडे अनेक वेळा मागणी करूनही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी केले आहे.