Market Pudhari
पुणे

Khadkeshwar Vegetable Market: फुरसुंगीतील खडकेश्वर भाजी मंडईचा निधी रखडला; प्रशासकीय इमारतीचा प्रस्तावही रद्द

कोट्यवधींचा निधी उपलब्ध असतानाही शेकडो विक्रेते उघड्यावर; सात दिवसांत खुलासा न केल्यास आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: फुरसुंगी येथील खडकेश्वर भाजी मंडईच्या (बाजार मैदान) जागेवर फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेची प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. याबाबत खडकेश्वर भाजी विक्रेता असोसिएशनने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा मागितला आहे. तसेच भाजी मंडईसाठी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अद्याप वापरण्यात का आला नाही, याबाबत सात दिवसांत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे.

खडकेश्वर भाजी मंडईच्या जागेवर नगर परिषदेची प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, हा प्रस्ताव रद्द झाल्याचे समोर आले आहे. हा प्रस्ताव नेमक्या कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आला, याबाबतचा ठराव आणि संबंधित कागदपत्रांसह प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

दरम्यान, खडकेश्वर भाजी मंडईसाठी आमदार निधीतून मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा आहे. नगर परिषदेने आवश्यक कामाची पूर्तता न केल्यामुळे हा निधी वापरता येत नसल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. वारंवार मागणी करूनही या निधीतून भाजी मंडईचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. यामागील कारण काय, असा सवाल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाडळे, उपाध्यक्ष विशाल हरपळे आणि सचिव चैत्राली हरपळे यांनी केला आहे.

निधी उपलब्ध असतानाही भाजी मंडईचे काम रखडल्याने शेकडो भाजी विक्रेत्यांना सध्या उघड्यावर व्यवसाय करावा लागत आहे. पावसाळ्यात भाजीपाला भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या नुकसानीस जबाबदार कोण, याबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

नगर परिषदेने भाजी मंडईसाठी मंजूर झालेला निधी वापरण्याबाबत तसेच प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव रद्द करण्यामागील कारणांबाबत सविस्तर व मुद्देनिहाय लेखी खुलासा सात दिवसांत करावा; अन्यथा असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सुनील भाडळे, अध्यक्ष, खडकेश्वर भाजी विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT