खडकवासला: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी उमेदवारांची धावपळ सुरू होती. पक्षाने तिकीट नाकारलेले नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धडपड करत होते.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग 33, 34 व 35 मध्ये मंगळवारी दिवसभरात 124 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांसह त्यांच्या इच्छुकांनी आजही मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.
सकाळपासूनच आपल्या समर्थकांसह आणि शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचत होते. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर अपक्ष उमेदवारांनीही आज आपले अर्ज सादर केले.
आज बुधवारी छाननी होणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत कोणी, कुठल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्या, हे चित्र काही ठिकाणी स्पष्ट झाले नाही.
एबी फॉर्म न मिळाल्याने भावूक
भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असल्याने इच्छुक महिलेने 29 आणि 30 डिसेंबर असे दोन्ही दिवस क्षेत्रीय कार्यालयात हजेरी लावली. मात्र, एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. बाहेर पडताना त्या भावूक झाल्या होत्या. प्रवर्ग सर्वसाधारण महिलेसाठी खुला असूनही पक्षाने ओबीसी महिलेला उमेदवारी दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.