Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Project Summer Water Rotation: खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन बंद; अडीच लाख हेक्टर शेतीला फटका

दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; धरणांतील उपलब्ध साठा राखून ठेवण्याचा निर्णय, पुण्यासह पाच तालुक्यांतील सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दुष्काळी परिस्थितीत खडकवासला प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा कालव्यातून उन्हाळी आवर्तन देण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उन्हाळी आवर्तनातून सिंचन होणार्‍या अडीच लाख हेक्टर शेतीला फटका बसणार आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणी पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर आणि हवेली या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्यासाठी वापरले जाते. चारही धरणांमध्ये एकूण २९ टीएमसी पाणीसाठा निर्माण होतो. यंदा पावसाळ्यात चारही धरणे तुडुंब भरली. पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे मुठा नदीतून सुमारे १९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, त्याचदरम्यान हे अतिरिक्त पाणी कालव्यातूनही सोडण्यात आले.

रब्बीचे आवर्तन सुरू होण्यापूर्वी सुमारे ६.३८ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. या चारही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा फायदा खरिपातील पिकांना झाला. यंदा रब्बीचे आवर्तन दि. २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन ४५ दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे ११०० क्युसेकने हे पाणी सोडण्यात येत आहे. सुमारे चार टीएमसी पाणी पहिल्या आवर्तनातून देण्यात येणार आहे.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदा उन्हाळी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये या तालुक्यांसाठी खरिपाचे पंधरा दिवस आवर्तन सुरू होते. त्यात सुमारे ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. दिवाळीपर्यंत पाऊस सुरू असल्याने रब्बीचेही आवर्तन नऊ डिसेंबर ते दहा फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू होते. या ६४ दिवसांत सुमारे ३.७७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पहिले उन्हाळी आवर्तन दि. १७ फेब्रुवारी ते ११ मेपर्यंत ८४ दिवस सोडण्यात आले.

याचदरम्यान हडपसरजवळ कालवा फुटल्याने नऊ दिवस आवर्तन बंद करण्यात आले होते. या कालावधीत ६.९७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. यातून सुमारे अडीच लाख हेक्टरला सिंचन करण्यात आले होते. या तालुक्यांसाठी दुसरे उन्हाळी आवर्तन दि. १२ मे ते १३ जूनपर्यंत असे ३३ दिवसांसाठी सोडण्यात आले. या कालावधीत ३.४० टीएमसी पाणी सोडले. त्यामुळे एकूण दोन उन्हाळी आवर्तनासाठी १०.३५ टीएमसी पाणी वापर झाला. दुष्काळी परिस्तिथीमुळे आता हे आवर्तन सोडण्यात येणार नसल्याने शेतीला फटका बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT