दत्तात्रय नलावडे
खडकवासला: दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करूनही खडकवासला येथे महापालिका संपर्क कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. कार्यालयाच्या छतातून पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याने अधिकारी आणि कर्मचार्यांना डोक्यावर छत्री धरून कामकाज करावे लागत आहे.
पावसामुळे छतासह भिंती, फर्निचर आणि लोखंडी साहित्य कमकुवत झाले असून, दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या कार्यालयाच्या आवारात गवत, झुडपे, कचरा आणि दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विषारी सापांचाही वावर असल्याने कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तसेच विविध दाखले नागरिकांना विनाविलंब एकाच छताखाली संगणकीकृत कार्यालयातून मिळत असल्याने खडकवासला ग्रामपंचायत कार्यालयाने राज्यस्तरावर लौकिक मिळविला होता. मात्र, महापालिकेचा कारभार सुरू झाल्यापासून या कार्यालयाची दुरवस्था झाली आहे.
१८ वर्षांपूर्वी खडकवासलाचा समावेश महापालिकेत करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने या कार्यालयाचे नामकरण 'सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संपर्क कार्यालय, खडकवासला' असे केले. या कार्यालयातून करसंकलनासह विविध कामकाज सुरू असून, आरोग्य कोठीसह इतर विभागांचे कामकाजही चालते. मात्र, प्रशासनाचे या कार्यालयाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.
कार्यालयाच्या इमारतीचे छत लोखंडी पत्र्यांचे असून, अनेक पत्रे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट कार्यालयात पडत आहे. पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती, पत्रे, फर्निचर व लोखंडी साहित्य कमकुवत झाले आहे. यामुळे जोरदार वादळी पावसात छत किंवा भिंती कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
३० कर्मचारी असूनही कचऱ्याचे ढीग
खडकवासला येथे आरोग्य विभागाचे ३० हून अधिक सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. असे असतानाही संपर्क कार्यालयाच्या शेजारी कचऱ्याचे ढीग, गवत-झुडपे आणि दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. आवाराच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
महापालिकेचा कारभार सुरू झाल्यापासून कार्यालयाची दुरवस्था सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांत महापालिकेने छतासह इतर दुरुस्तीसाठी अनेकदा लाखो रुपये खर्च केले. मात्र, ठेकेदार व अधिकार्यांनी संगनमताने वरवरची कामे करून लाखो रुपयांची बोगस बिले काढल्याचा संशय आहे. यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करून कार्यालयाची आवश्यक दुरुस्ती करावी.-राहुल मते, रहिवासी, खडकवासला
खडकवासला संपर्क कार्यालयाची तातडीने पाहणी करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी केली जाईल. कर्मचारी व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.- प्रज्ञा पोतदार-पवार, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय