Khadakwasla Dam Water Storage Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Storage: धरणसाखळीतील पाणीसाठ्यात किंचितशी वाढ; यंदाच्या पावसाळ्यात प्रथम भर

खडकवासला प्रकल्पात सध्या १२.४५ टक्के साठा शिल्लक

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: जून महिना संपला, तरी खडकवासला धरणसाखळीतील चारही धरण क्षेत्रांत अद्याप जोरदार पाऊस पडला नाही. मात्र, गेल्या आठवड्यात आणि सोमवारी (दि. २९) रात्री परिसरात पडलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात ०.०२ टीएमसीची किंचितशी भर पडली आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

धरणसाखळीत मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ३.६३ टीएमसी (१२.४५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. दिवसभरात पानशेत येथे ३, वरसगाव येथे ४ व टेमघर येथे ८ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणमाथ्यावर पावसाची नोंद झाली नाही. गतवर्षी ३० जून २०२५ रोजी धरणसाखळीत १४.३३ टीएमसी इतका पाणीसाठा (४९.१५ टक्के) झाला होता.

रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील माणगाव, दापसरे, कुर्तवडी तव, धामणगाव ओहळसह पानशेत-वरसगाव धरणक्षेत्रात सोमवारी (दि. २९) रात्रीपासून मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चांगला पाऊस पडला. तसेच, गेल्या आठवड्यात देखील धरण क्षेत्रात पाऊस झाला होता. यामुळे मंगळवारी धरणसाठ्यात ०.०२ टीएमसीची किंचित भर पडली. सध्या परिसरात पावसाने उघडीप दिली आहे.

पुणे शहर व परिसराला पिण्यासाठी खडकवासला धरणातून जवळपास ५०० क्सुसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणसाठ्यात घट सुरू आहे. पानशेत धरणातून ६१९ क्सुसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. त्यामुळे पानशेतमध्ये देखील घट सुरू आहे. वरसगावमधून पाणी सोडले जात नसल्याने या धरणात किंचित भर पडत आहे. टेमघर अद्यापही शून्यपातळीवर आहे.

पानशेत खोऱ्यातील माणगाव येथील शेतकरी विशाल सांगळे म्हणाले की, सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडला. त्यामुळे ओढे दुथडी भरून वाहू लागले. मात्र, मंगळवारी सकाळपासून पाऊस कमी झाल्याने ओढ्याचे पाणी कमी झाले आहे.

गेल्या दहा वर्षांत सर्वांत कमी पाऊस

जून महिना संपला, तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडला नाही. खडकवासला धरणसाखळीने अल्पसाठा पातळी गाठली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते ३० जून या काळात पानशेत व टेमघर येथे सर्वाधिक प्रत्येकी १०२ मिलिमीटर पाऊस पडला. तर, याच कालावधीत खडकवासला ८७ व वरसगाव येथे ९८ मिलिमीटर पाऊस पडला. जून महिन्यात गेल्या दहा वर्षांत धरणक्षेत्रात प्रथमच अल्प पाऊस पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT