खडकवासला: बारामती, दौंड, इंदापूरसह हवेली तालुक्यातील शेतीसाठी खडकवासला धरणसाखळीतून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. गेल्या 30 दिवसांत शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 29 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत 2.52 टीएमसी पाणी नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे सोडण्यात आले. यामुळे पिकांना आधार मिळाला आहे.
उन्हाची तीवता वाढत असल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा इंदापूर, हवेली, दौंड आणि बारामती या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील पिकांना होत आहे. प्रामुख्याने उन्हाळी पिके आणि फळबागांना हे पाणी संजीवनी ठरत आहे.
मे महिन्यापर्यंत उन्हाळी आवर्तन सुरू राहणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर यांनी सांगितले. यंदा धरणांमध्ये पाण्याची स्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे. सध्या चारही धरणांत मिळून 10.67 टीएमसी म्हणजे 36.61 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 9.42 टीएमसी म्हणजे 32.30 टक्के होता.
धरणसाखळीत समाधानकारक पाणीसाठा
जिल्ह्यातील शेतीसह पुणे शहरासाठी देखील पाणी सोडले जात आहे. वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याची वाढती गरज, यामुळे सिंचन विभागासमोर नियोजनाचे आव्हान आहे. सध्या तरी धरणसाखळीत समाधानकारक पाणीसाठा आहे.