Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Level: खडकवासला धरणसाखळीत 24 तासांत 4 टीएमसी पाण्याची भर; खडकवासला धरण शंभर टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर

धरणातून कालव्यात विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: तुफानी पावसामुळे खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात अवघ्या २४ तासांत ४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची भर पडली आहे. हे पाणी पुणे शहराला साधारण अडीच महिने पुरेल एवढे आहे. मंगळवारी सांयकाळी पाचपर्यंत धरणसाखळीत एकूण १२.२१ टीएमसी म्हणजे ४१.८८ टक्के पाणीसाठा झाला होता.

रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यासह पानशेत, मोसे, मुठा, सिंहगड भागासह धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (दि. ६) सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पानशेत येथे विक्रमी २५८, तर याच कालावधीत वरसगाव येथे २४०, टेमघर येथे १९९ व खडकवासला येथे १०० मिलिमीटर पाऊस पडला.

खडकवासला धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने दुपारी चार वाजता धरणातून मुठा कालव्यात ५०० क्सुसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण शंभर टक्के भरल्यावर मुठा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला साखळीत जवळपास चार टीएमसीची वाढ पडली. सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत ८.३२ टीएमसी पाणी होते.

धरण खोऱ्यातील जनजीवन ठप्प

चारही धरणक्षेत्रांत पावसाने थैमान घातले आहे. पानशेत, सिंहगड, मुठा भागात ढगफुटीसदृश पाऊस पडला. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ओढ्यांना पूर आले आहेत. त्यामुळे या भागातील जनजीवन ठप्प पडले आहे.

जोरदार पावसामुळे चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यामुळे पाण्याची वाढती आवक आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. धरणातून लगेचच मुठा नदीत पाणी सोडले जाणार आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी.
किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण जलसंपदा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT