Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Level: खडकवासला धरणसाखळीत 24 तासांत 2.14 टीएमसी पाण्याची वाढ; मुठा नदीत पाणी सोडण्याची शक्यता

धरणसाखळीतील पाणीसाठा 69.17 टक्क्यांवर; पानशेत, वरसगाव आणि टेमघर वेगाने भरत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत-मुठा खोऱ्यात बुधवारी (दि. २२) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नद्या, ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याने धरणसाठ्यात पाण्याची आवक वेगाने वाढली असून, गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत तब्बल २.१४ टीएमसी पाण्याची वाढ झाली. सायंकाळी ५ वाजता धरणसाखळीत २०.१६ टीएमसी म्हणजे ६९.१७ टक्के पाणीसाठा झाला होता. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यालगतच्या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. खडकवासला धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे ९० टक्के साठा झाल्यावर खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार आहे.‌

पानशेत जवळपास ७५ टक्के तर वरसगाव जवळपास ७० टक्के भरले आहे. टेमघरने पन्नासी ओलांडली आहे. खडकवासला, सिंहगड भागात अधूनमधून उघडीपीनंतर रिमझिम पाऊस पडत आहे; मात्र वरसगाव, टेमघर व पानशेत धरण क्षेत्रासह घाटमाथ्यालगतच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जोर वाढला आहे. मोसे, आंबी व मुठा नदी, ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

मंगळवारी (दि. २१) रात्रीपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणांत १०० टक्के साठा केला जात आहे. सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर कायम राहिल्यास चार पाच दिवसात तिन्ही धरणे शंभर टक्के भरण्याची शक्यता खडकवासला जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवारी सकाळी ६ ते बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ३५ तासात टेमघर येथे विक्रमी २४२ मिलिमीटर पाऊस पडला.

खडकवासलात दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला. त्यामुळे पाण्याची आवकही थोडी कमी झाली आहे; मात्र धरणसाठ्यात पाण्याची वाढ सुरू आहे. ९० टक्के पाणीसाठा झाल्यावर खडकवासलातून मुठा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT