शिवाजी शिंदे
पुणे: जलसंपदा विभागाने खडकवासला प्रकल्पातील 10 टीएमसी शिल्लक राहिलेल्या पाण्याच्या नियोजनानुसार पुण्याला 31 जुलैपर्यंत पिण्यासाठी 4.7 टीएमसी पाणी, तर गामीण भागात पिण्यासाठी 3 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
तरीही धरणात तब्बल 2 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. असे असले तरी पुण्यात पाणी कपात करावी लागेल. अशी आश्चर्यकारक चर्चा जलसंपदा विभागात करण्यात येत आहे. सिंचनासाठी केलेले नियोजन कचऱ्यात टाकून सिंचनाला जादा पाणी वापरले जाण्याची दाट शक्यता आहे.
खडकवासला प्रकल्प साखळीत गुरुवारी ( दि.14 ) एकूण पाणीसाठा 8.41 अब्ज घनफूट (टीएमसी) असून , पुणे शहराला जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध आहे. पावसाळा लांबण्याचा अंदाज असल्याने, तसेच सिंचनासाठी जादा पाणी द्यावे लागल्यास, जून-जुलैमध्ये पुण्यात काही प्रमाणात पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे.
पुणे शहराला दरवर्षी 21 टीएमसी पाणी लागते. त्यापैकी 18 टीएमसी म्हणजे दरमहा दीड टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. उर्वरित पाणी भामा आसखेड आणि पवना धरणातून मिळते.
जलसंपदाचे नियोजन
जलसंपदा विभागाने 30 एप्रिल रोजी धरणातील एकूण पाणीसाठा 10.27 टीएमसी असताना नियोजन केले. त्यानुसार, पुणे शहरासाठी 31 जुलैपर्यंत 4.7 टीएमसी पाणी आरक्षित ठेवले. सिंचनासाठी 2.8 टीएमसी आणि ग्रामीण भागातील पिण्यासाठी 0.3 टीएमसी पाणी लागणार आहे. बाष्पीभवन 0. 82 टीएमसी अपेक्षित आहे.
अशारीतीने 8. 22 टीएमसी पाण्याचे नियोजन केले तरी देखील धरणात दोन टीएमसी पाणी शिल्लक राहील, असे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात 1.86 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
हवामान विभागाने पुढील वर्षी 92 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला. त्यानंतर, ऑगस्टअखेरपर्यंत पिण्यासाठी धरणातील पाणी राखून ठेवण्याची सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यामुळे, पंधरा टक्के पाणीकपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला केली. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
महापालिकेने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला. अनेक भागांत दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा झाला नाही तर काही भागांत तिसऱ्या दिवशी विस्कळीत पाणीपुरवठा झाला. टँकर लॉबीने याचा फायदा घेतला.
उन्हाळी आवर्तनासाठी दहा टीएमसी पाणी
दरवर्षी सिंचनासाठी उन्हाळी दुसरे आवर्तन देणार की नाही यावर चर्चा होते. मात्र, गेल्या वर्षीपासून जलसंपदा विभागाने मेमध्येच दुसरे आवर्तन घेण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी आणि यंदाही सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन 18 फेबुवारीला सुरू केले. त्यापूर्वी ते मार्चमध्ये सुरू होत असे. गेल्या वर्षी 18 फेबुवारी ते 25 मे असे 98 दिवस सलग दोन आवर्तनं घेण्यात आली. त्यासाठी 8.96 टीएमसी पाणी वापरले.
यंदा 18 फेबुवारी ते 11 मेपर्यंत सिंचनाचे पहिले उन्हाळी आवर्तन घेतले. 76 दिवसांच्या या आवर्तनासाठी 6.97 टीएमसी पाणी वापरले. दुसरे उन्हाळी आवर्तन एक महिना घेणार असून, त्यासाठी 3.10 टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. म्हणजे दोन उन्हाळी आवर्तनांसाठी दहा टीएमसी पाणी वापरले जाईल.
सिंचनाच्या उन्हाळी आवर्तनासाठी गेल्या सहा-सात वर्षात एवढे पाणी कधी वापरण्यात आले नव्हते. उन्हाळी आवर्तनासाठी आणखी पाणी वाढविले आणि पाऊस लांबला तर मात्र धरणातील पाणी पुरवून वापरण्याची जबाबदारी पुणे महापालिकेवर असणार आहे. सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी देखील जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या सूचनेनुसार ऑगस्टपर्यंतचे पाणी राखून ठेवण्यासाठी जून, जुलैमध्ये काही दिवस पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे.