खडकवासला: गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर मंगळवारी (दि. २३) रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत खोऱ्यातील घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात दमदार हजारी लावली. दिवसभरात वरसगाव येथे १८, तर पानशेत येथे १७ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणमाथ्यावर दिवसभरात पावसाची नोंद झाली नाही, तर टेमघर येथे ४ मि.मी. पाऊस पडला.
सिंहगडच्या पश्चिम खोऱ्यासह पानशेत, मुठा, मोसे, शिरकोली, दापसरे, धामण ओहोळ खोऱ्यात सायंकाळी पावसाची रिपरिप सुरु होती. धरणक्षेत्रातील मान्सूनच्या दमदार आगमनामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत ३.८४ टीएमसी म्हणजे केवळ १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत अल्प पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणसाखळीत ३५. ८३ टक्के पाणीसाठा होता.
धरणक्षेत्रात प्रथमच पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरत आहे. अद्याप ओढे-नाले-नद्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले नाहीत. त्यामुळे धरणसाठ्यात भर पडण्यास सुरुवात झाली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठ्यात दोन दिवसांत मंदगतीने भर पडण्यास सुरुवात होईल.गिरिजा कल्याणकर-फुटाणे, खडकवासला धरण विभाग, शाखा अभियंता