Khadakwasla Dam Forest Restoration Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Forest Restoration Project: खडकवासला धरण परिसरात वनराईमुळे तयार झालेला हरित पट्टा पर्यटकांचे आकर्षण

वनरुजवणी प्रकल्पामुळे तापमानात घट आणि पर्यटनात वाढ

पुढारी वृत्तसेवा

दत्तात्रय नलावडे

खडकवासला: पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. मात्र, कडक उन्हाळ्यातही खडकवासला धरणतीरावर वनराई बहरल्याने परिसरात थंडगार हवा वाहत आहे. यामुळे भागात सध्या पर्यटकांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही वनराई पर्यवरणाच्या अभ्यासकांसह पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

माजी कर्नल सुरेश पाटील यांच्या परिश्रमातून खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून धरणाच्या दोन्ही तीरांवर चाळीस किलोमीटर अंतराच्या परिसरात वनराईसह देवराई, जंगल, वृक्ष पुनर्वसन, वनौषधी पार्क आदी विविध वनीकरण प्रकल्प उभे राहिले आहेत. पाटील यांनी ग््राीन थंब संस्था, खडकवासला जलसंपदा विभाग आणि लोकसहभागातून गेल्या पंधरा वर्षांत धरणातून काढण्यात आलेला गाळ दलदलीच्या पडीक जागेवर टाकून नवीन 800 एकर जमीन तयार केली आहे. त्या जमिनीवर बांबू, नारळ, फणस आदी वीस लाख वृक्षांची लागवड केली आहे.

खडकवासला धरणाच्या डाव्या तीरावरील खडकवासला, गोऱ्हे बुद्रुकपासून खानापूर, सोनापूर, आंबी पानशेतपर्यंत आणि डाव्या तीरावरील कुरण बुद्रुक, जांबलीपासून मांडवीपर्यंत खडकवासला धरणातून काढलेला गाळ पडीक जमिनीवर टाकून वीस लाख वृक्षांचा हरित पार्क उभारण्यात आला आहे. तसेच, चाळीस किलोमीटर अंतराचा शेतरस्ताही तयार करण्यात आला आहे. खानापूरचे माजी सरपंच नीलेश जावळकर म्हणाले की, धरणातून काढलेला गाळ मोफत दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती, भाजीपाला, फळबागांपासून उत्पन्न मिळत आहे. रस्त्यामुळे शेती मालासह दूध वाहतुकीची सोय झाली आहे.

अशी आहे वनराई...

धरणाच्या दोन्ही तीरांवर आंबा, सुपारी, नारळ, बांबू आदी वृक्षांची हिरवीगार वनराई बहरली आहे. लोकसहभागातून धरणतीरावर मासे उत्पादनासाठी तळी, पक्ष्यांच्या निवासासाठी बेट, पादचारी मार्ग आणि गावोगावी दशक्रिया विधी घाट तयार करण्यात आले आहेत.

खडकवासला धरणाच्या दोन्ही तीरांवर मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हातही या परिसरात गारवा आहे. उन्हाची तीवता अधिक असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मात्र सुरू आहे. मात्र, दाट वनराईमुळे उन्हाची तीवता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.
गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण जलसंपदा विभाग
धरणातील गाळ काढण्यात येत आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता 0.20 टीएमसीने वाढली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही पुणेकरांसह जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत आहे. गाळामुळे पडीक शेतजमिनी लागवडीखाली आल्याने राष्ट्रीय संपत्तीत भर पडत आहे.
सुरेश पाटील, अध्यक्ष, ग््राीन थंब संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT