खडकवासला: लागोपाठ चौथ्या दिवशीही रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह सिंहगड-पानशेत, मोसे, मुठा खोऱ्यात अतिवृष्टीचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे चार धरणांची खडकवासला धरणसाखळीची साठ टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. बुधवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत १४.९५ टीएमसी म्हणजे ५१.३० टक्के साठा झाला होता. खडकवासला धरण मध्यरात्री बारा वाजल्यापासून शंभर टक्के भरून वाहत आहे.
टेमघरमध्ये मंगळवारी (दि.७) सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत उच्चांकी २४५, तर पानशेतमध्ये १७१, वरसगावमध्ये १८९ व खडकवासलामध्ये १०१ मिलीमीटर पाऊस पडला. खडकवासलातून रात्रीपासून मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. अतिवृष्टीच्या थैमानामुळे पहाटे साडेपाच ते दुपारी साडेबारापर्यंत खडकवासलातून २७ हजार २०३ क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सिंहगड रस्ता, उत्तमनगर परिसरातील सोसायट्या लोकवस्त्यांत नदीचे पाणी शिरले.
सकाळी दहा वाजल्यापासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. पाण्याची आवकही कमी झाली. त्यामुळे मुठा नदीतील विसर्ग रात्री ८ वाजेपर्यंत १८ हजार २७१ क्युसेक, रात्री १० पर्यंत १५,१५७ क्युसेक तर साडेदहापर्यंत ६२९६ क्युसेक विसर्ग सुरू होता. रात्री साडेदहा नंतर विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या २४ तासांत धरण साखळीत पावणेतीन टीएमसी पाणीसाठ्याची वाढ झाली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत १२.२१ टीएमसी पाणी होते. मुठा कालव्यातील विसर्गही ७०० क्युसेकपर्यंत वाढविला हाेता.
अतिवृष्टीमुळे चारही धरणक्षेत्रात तसेच मुठा नदीच्या पात्रात पर्यटक, नागरिक शेतकऱ्यांनी उतरू नये. जनावरे सोडू नयेत. रहिवाशांसह नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.
मध्यरात्रीपासून बुधवारी सकाळी सातपर्यंत सिंहगड, मुठा, मोसे खोऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे मोसे, मुठा, आंबी नद्यांसह धरण खोऱ्यातील ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.
पानशेत धरणात ५३ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. वरसगावही जवळपास अर्धे भरले आहे. गेल्या तीन दिवसांत पुण्याला पाच महिने पुरेल इतक्या पाण्याची भर धरण साखळीत पडली आहे. ५ जुलै रोजी सकाळी धरण साखळीत ५.०९ टीएमसी पाणी होते.
पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे संकट टळले
पाऊस एक महिना उशिरा सुरू झाला आहे. चार दिवसांच्या अतिवृष्टीने १.९७ टीएमसी क्षमतेचे खडकवासला धरण भरून वाहत आहे. वरसगाव वगळता पानशेत व टेमघर धरणे अद्यापही पन्नास टक्के भरली नाहीत.
खडकवासला धरणाचे पाणलोटक्षेत्र थेट वरील तिन्ही धरणांच्या भिंतीपर्यंत ४५ किलोमीटर अंतराच्या विस्तीर्ण परिसरात पसरले आहे. खडकवासला धरण माथ्यावर कमी पाऊस आहे. त्यापेक्षा अधिक पाऊस धरण क्षेत्रातील मोसे, मुठा खोऱ्यात पडत आहे. मध्यरात्री बारा वाजता खडकवासला धरण शंभर टक्के भरून वाहू लागले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाने दुपारी सुटकेचा निःश्वास सोडला.
शेतीसह नागरिकांना दिलासा
जून महिना कोरडा गेल्यानंतर धरणक्षेत्रात १ जुलै रोजी मान्सून सुरू झाला. मात्र, सुरुवातीला चार-पाच दिवस पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पुणेकरांना भीषण पाणीटंचाईची टांगती तलवार उभी होती. अतिवृष्टीमुळे धरणसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आठवडाभरात धरण साखळी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांसह हजारो हेक्टर शेतीला दिलासा मिळणार आहे.