वेल्हे: मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात घाटमाथ्यासह पानशेत-वरसगाव खोऱ्यात तुरळक पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी जवळपास निम्म्याने कमी झाली असली, तरी ४ धरणांच्या खडकवासला धरण साखळीत सोमवारी (दि. २१) सायंकाळी ५ वाजता २८.२१ टीएमसी म्हणजे ९७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
सोमवारी दिवसभरात खडकवासला व वरसगाव येथे प्रत्येकी ३ मिलिमीटर, तर पानशेत येथे २ मिलिमीटर इतक्या अल्प पावसाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत-वरसगाव धरण खोऱ्यात तुरळक पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस नसल्याने धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक जवळपास बंद झाली असून, धरण साखळीतील पाणीसाठ्यात मंदगतीने घट होत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साखळीत जवळपास एक टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी २१ सप्टेंबर २०२५ रोजी धरण साखळीत २९.१२ टीएमसी म्हणजे ९९.८९ टक्के पाणीसाठा होता. पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. खडकवासला धरणातून शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी १ हजार ६७६ क्युसेक पाणी सोडले जात असल्याने धरणाच्या साठ्यात घट सुरू आहे. खडकवासला धरणाची पातळी १.०४ टीएमसी म्हणजे ५२.५१ टक्क्यांवर आली आहे. तसेच, वरसगाव धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून खडकवासला धरणात ६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
तुरळक पावसामुळे धरण साखळीतील पाणीसाठा १८ सप्टेंबरपासून जवळपास स्थिर आहे. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धरण साखळीत ९६.८७ टक्के पाणीसाठा होता. ४ दिवसांत धरण साखळीत ०.०९ टीएमसी इतकी किरकोळ घट झाली आहे.
सोमवारचा पाणीसाठा धरण टीएमसी टक्केवारी
खडकवासला १.०४ ५२.५१
पानशेत १०.६५ १००
वरसगाव १२.८२ १००
टेमघर ३.७१ १००
एक-दोन जोरदार पाऊस पडल्यास पाण्याची तूट भरून धरण साखळी पुन्हा १०० टक्के भरणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसा साठा शिल्लक राहण्यास मदत होणार आहे.वीरेश राऊत, शाखा अभियंता, खडकवासला धरण