खबर्‍यानं चोख काम बजावलं अन् चोरट्यांची टोळी जेरबंद झाली Pudhari
पुणे

Pune Crime: खबर्‍यानं चोख काम बजावलं अन् चोरट्यांची टोळी जेरबंद झाली

पालखी सोहळ्यात महिलांच्या दागिण्यावर मारत होते डल्ला

पुढारी वृत्तसेवा

पुणेः खबर्‍यानं आपलं काम चोख बजावलं, साहेब लातुरहून काही महिला पालखी सोहळ्यात चोर्‍या करण्यासाठी आल्या आहेत. चोरी करताना त्यांना मी आत्ताच पाहिलंय. चोरीचा माल त्यांनी आपल्या पिशवीच्या चोर कप्प्यात ठेवलायं. सोलापूरकडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत त्या, गाडीतळ परिसरात थांबल्यात.

गुन्हे शाखा युनिट सहा आणि पाचच्या पथकाने केवळ महिलांच्या वर्णनावरून गुन्ह्यांचा छडा लावत वारी सोहळ्यात महिलांचे दागिणे चोरी करणार्‍या रेकॉर्डवरील टोळीचा पर्दाफाश केला आहे. तर मोबाईल चोरी करणार्‍या झारखंड येथील एका चोरट्याला अटक केली आहे. (Latest Pune News)

यावेळी पोलिसांनी 23 तोळे सोन्याचे दागिणे,14 मोबाईल असा एकूण 23 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी, हडपसर, वानवडी आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

चांदणी शक्ती कांबळे ( वय 32), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे ( वय 35), बबिता सूरज उपाध्ये ( वाय 7), पूजा धीरज कांबळे ( वय 35, सर्व रा. उदगीर, जि . लातूर ) आणि गणेश विलास जाधव ( वय 30, रा. सोलापूर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील बहुतांश आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

यात्रा, गर्दीची ठिकाणे येथे चोर्‍या करण्यात यांचा हातखंडा असल्याचे पोलिस सांगतात. त्याचबरोबर या पथकाने अरबाज नौशाद शेख ( वय 19, रा. महाराजपूर, झारखंड ) याला अटक केली असून, त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी गर्दीचा फायदा घेत भाविकांचे मोबाईल चोरी केले होते.अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी मंगळवारी (दि.24) पत्रकार परिषदेत दिली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्यावेळी हडपसरमध्ये मोठी गर्दी उसळते. त्या गर्दीचा गैरफायदा घेऊन दरवर्षी चोरटे महिलांचे दागिने व मोबाईल पळवतात. ती बाब लक्षात घेऊन यंदा गुन्हे शाखेची पथके तेथे तैनात करण्यात आली होती.

दरम्यान, पोलिस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखिले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, लातूर येथून महिलांची एक टोळी पालखी सोहळ्यात दागिणे चोरी करण्यासाठी आली आहे. त्यांनी आत्ताच काही महिलांचे दागिणे चोरी केले आहेत. चोरीचा ऐवज आपल्या बॅगेच्या चोर कप्प्यात ठेवले आहेत. खबर्‍याने पोलिसांना महिलांचे वर्णन सांगितले होते. या महिला सोलापूरला जाण्याच्या तयारीत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी गाडीतळ परिसरात खबर्‍याने सांगितलेल्या वर्णनाच्या महिला शोधून काढल्या. त्यांचा फोटो त्याला पाठवताच त्याने याच चोर्‍या करणार्‍या महिला असल्याचे सांगितले. महिला पोलिसांच्या मदतीने संशयीत महिलांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडीती घेतील असता, चोरी केलेला ऐवज मिळून आला. चोरी केलेले सोन्याचे काही दागिणे आरोपी महिलांनी कचरा कुंडीत टाकून दिले होते. ते दागिणे देखील पोलिसांनी शोधून काढले. चोरी गेलेल्या दागिण्याबाबत नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, संजय पतंगे, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे पोलिस कर्मचारी राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, अकबर शेख, वैशाली खेडेकर, निलेश साळवे, सुहास डोंगरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT