Ketan Agarwal Murder Case Pudhari
पुणे

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील; ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

वडील विशाल अग्रवाल यांच्या मागणीनंतर नियुक्ती; सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्याविरोधात आरोपपत्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशभरात चर्चेत आलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करून विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक निर्देश दिले होते. त्यानुसार ही नियुक्ती केली आहे. व्यावसायिक केतन अग्रवालचा १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून करण्यात आला.

या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून वडगाव मावळ न्यायालयात पाच हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सिया प्रवीण गोयल, चेतन बाबूलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात आरोपींच्या मोबाईलमधील डेटा, व्हॉट्सॲप संभाषणे, छायाचित्रे, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), तांत्रिक विश्लेषणाचे अहवाल आणि विविध कागदपत्रांचा समावेश आहे.

काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये नोंदविण्यात आले आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने सरकारी पक्षाची बाजू मांडण्याच्या दृष्टीने या खटल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT