Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या 25 वर्षीय केतन अग्रवालच्या मृत्यूला सुरुवातीला अपघात समजले जात होते. फोटो काढताना पाय घसरून तो दरीत पडल्याची माहिती कुटुंबीय आणि पोलिसांना देण्यात आली होती. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या काही महत्त्वाच्या धागेदोऱ्यांमुळे हा अपघात नसून नियोजित हत्येचा कट असू शकतो, असा संशय बळावला. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
18 जून रोजी लोहगड किल्ल्याजवळ केतन अग्रवाल दरीत कोसळून मृत्युमुखी पडला. त्यावेळी हा अपघाती मृत्यू असल्याचे मानून पोलिसांनी नोंद केली होती. लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना घडलेल्या या घटनेमुळे सिया गोयलबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. पाहुण्यांची व्यवस्था, कार्यक्रमांची आखणी यामध्ये सर्वजण गुंतलेले असतानाच ही घटना घडली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलच्या जबाबात काही विसंगती आढळून आल्या. त्यामुळे तपास अधिक सखोल करण्यात आला. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. याच तपासादरम्यान पोलिसांच्या नजरेस एक संशयास्पद तरुण आला. तो केतन आणि सियाच्या वाहनाच्या मागोमाग जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरुणाने कडक उन्हातही हुडी घातली होती. ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटली. पुढील तपासात त्या तरुणाची ओळख 22 वर्षीय चेतन चौधरी अशी पटली. किल्ल्याजवळील इतर कॅमेऱ्यांमध्येही चेतन दिसून आल्याने पोलिसांनी सियाची पुन्हा चौकशी केली. यानंतर कथित कटाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सिया आणि केतन यांचे लग्न कुटुंबांच्या संमतीने ठरले होते. मात्र सिया दुसऱ्या एका तरुणाच्या संपर्कात होती आणि हे लग्न तिला मान्य नव्हते, असा पोलिसांचा दावा आहे. याच कारणामुळे केतनच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांनी 31 मे रोजी प्रथमच लोहगड किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळीच कटाची आखणी झाली असावी, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
त्यानंतर 14 जून रोजी दोघे पुन्हा किल्ल्यावर गेले. त्या दिवशी चेतन चौधरीही परिसरात उपस्थित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र त्या वेळी कट पूर्ण होऊ शकला नाही.
यानंतर 18 जून रोजी केतन आणि सिया पुन्हा लोहगडवर गेले आणि याच दिवशी केतनचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मते, याच भेटीत पूर्वनियोजित कटाची अंमलबजावणी करण्यात आली.
या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस सर्व पुरावे आणि तांत्रिक माहितीची पडताळणी करत असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी केलेले दावे आणि तपासातील निष्कर्ष हे न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत आहेत. न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत सर्व आरोपी कायद्याच्या दृष्टीने निर्दोष मानले जातात.
पुण्यातील हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनले असून, एका साध्या वाटणाऱ्या अपघातामागे किती मोठे रहस्य दडले होते, यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.