मुंढवा: केशवनगर ते खराडी या नदीपात्रावरील पुलाचे काम वेगाने सुरू आहे. मागील दीड महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याठिकाणी पाहणी करून या पुलाचे काम 15 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सध्या काम वेगाने सुरू असून, 30 मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंढवा ते खराडी या मुख्य रस्त्यावर नदीपात्रावर असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून केशवनगर-खराडी या दुसऱ्या एका नदीपात्रावरील पुलाचे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. येथील महात्मा फुले चौकात खराडीकडून केशवनगरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने खराडी-केशवनगर या नदीपात्रावरील नवीन पुलावरून ये-जा करू लागली तर मुंढव्यातील महात्मा फुले चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मागील अनेक महिन्यांपासून केशवनगर-खराडी या नदीपात्रावरील पुलाचे काम रखडले होते. या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाच्या वतीने या पुलाच्या कामाच्या ठिकाणी आंदोलन केले होते. त्या वेळी केंद्रात व राज्यात सत्ता तसेच पुण्याचे खासदार व हडपसरचे आमदारही महायुतीचे आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग््रेासला आंदोलनाची वेळ का आली, अशी उपरोधिक टीकाही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या वेळी केली होती.
त्यानंतर मुंढवा व खराडी परिसरातील वाहतूक कोंडीविषयी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दीड महिन्यापूर्वी या पुलाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली.
केशवनगर-खराडी नदीपात्रावरील पुलाचे काम आम्ही वेगाने पूर्ण करत आहोत. सध्या रात्रंदिवस काम चालू आहे. मार्च 2026 अखेर या पुलाचे काम आम्ही पूर्ण करणार आहोत.संजय धारव, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, मनपा