Land Scam Pudhari
पुणे

Kesanand Land Fraud: केसनंद जमीन घोटाळा उघड; बनावट अकृषिक परवानगी प्रकरणी वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल

महसूल विभागाची दिशाभूल करून बनावट आदेश, सह्या व शिक्क्यांच्या आधारे शासनाची फसवणूक; दै. ‘पुढारी’च्या वृत्तानंतर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील केसनंद गावातील एका जमिनीच्या प्रकरणात महसूल विभागाची दिशाभूल करत बनावट अकृषिक परवानगी, फाळणीबारा, आकारफोड पत्रके आणि शासकीय आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दै.'पुढारी'ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद (ता. हवेली) येथील गट क्रमांक १७२ संदर्भातील फाळणीबारा व दुरुस्ती गटबुक अंमलबजावणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतील आदेशांवर अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या सह्यांबाबत शंका उपस्थित झाली होती. त्यानंतर महसूल विभागाने संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

तपासादरम्यान सादर करण्यात आलेल्या आदेशांवरील सह्या आणि शिक्के बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच संबंधित आदेशांमध्ये "तहसीलदार हवेली" असा उल्लेख करण्यात आला होता, तर तृप्ती कोलते-पाटील या "तहसीलदार लोणी काळभोर" म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरले.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडताळणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या अहवालात गट क्रमांक १७२ संदर्भात कोणतीही अकृषिक परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच संबंधित एसआर क्रमांकाची नोंदही शासकीय अभिलेखांमध्ये नसल्याचे नमूद करण्यात आले.

या प्रकरणात मोशी येथील अरुण दत्तात्रय गायकवाड यांनी केसनंद येथील गट क्रमांक १७२ संदर्भातील कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रासह तहसीलदार, अपर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे कथित आदेश पडताळणीत बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यामागे बनावट शासकीय आदेश, सह्या आणि शिक्के तयार करून नागरिकांची तसेच शासनाची फसवणूक करणारी संघटित साखळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत असून वाघोली पोलीस पुढील तपास करीत आहेत. दै. पुढारीने हे प्रकरण उघडकीस आणले होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT