पुणे: दौंड तालुक्यातील केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 21 वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय समितीच्या प्राथमिक अहवालात शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेतील जबाबदारी निश्चित होण्याची प्रक्रिया वेगाने पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना शिबिरादरम्यान घडली होती. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दरम्यान महिलेच्या नातेवाइकांकडून 40 ते 45 हजार रुपये आकारण्यात आल्याची बाब समोर आली होती.
प्रकरण गाजल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ही रक्कम परत केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले आहेत.
तसेच, या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन अधिक सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनापूर्वी महिलेचे स्कॅनिंग करण्यात आले असून, त्यातील निष्कर्षही तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.
अंतिम अहवालानंतर पुढील कारवाईची निश्चिती
या घटनेमुळे ग््राामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः शासकीय आरोग्य सेवांवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई निश्चित होणार आहे.