Fetal Determination Pudhari
पुणे

Kedgaon Sex Determination Case: केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणात मोठी कारवाई; डॉ. संगीता गायकवाड अटकेत

पार्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना अटक; आरोपींची संख्या सहावर, तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव येथे गाजत असलेल्या गर्भलिंगनिदान प्रकरणात तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. केडगाव स्टेशन येथील पार्थ हॉस्पिटलच्या डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (वय ६१) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दौंड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अण्णासाहेब गिरी, डॉ. अतुल जाधव, डॉ. मंदार माळी, सुंदरम कदम आणि डॉ. ठाकरे अशा पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता डॉ. संगीता गायकवाड यांचा देखील आरोपी म्हणून समावेश झाल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.

केडगाव परिसरात गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचे जाळे कार्यरत असल्याच्या चर्चेनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेषतः पार्थ हॉस्पिटलचे नाव वारंवार चर्चेत येत असतानाही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, १७ जून रोजी झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर या रॅकेटमागील आणखी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास विशेष तपास पथक आणि यवत पोलिस संयुक्तपणे करत आहेत. गर्भलिंगनिदान व बेकायदेशीर गर्भपातासारख्या अमानुष कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र मायने, दौंड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवतचे पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर तसेच विशेष तपास पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT