Fetal Determination Pudhari
पुणे

Kedgaon Illegal Fetal Determination Racket: केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत?

बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणामुळे खळबळ; मोठ्या नेटवर्कचा संशय, आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपार्धी परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येत असताना आता या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहचल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे केडगाव परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या रॅकेटमागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव-बोरीपार्धी परिसरातील गर्भवती महिलांना गुप्तपणे गर्भलिंग निदान चाचणी करून दिली जात होती. विशेष म्हणजे, चाचणी स्थानिक पातळीवर केली जात असली तरी त्यानंतर गर्भपातासाठी संबंधित महिलांना अहिल्यानगर जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांकडे पाठवले जात असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटमध्ये केवळ एजंट किंवा स्थानिक दलालच नव्हे तर काही वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

गर्भलिंग निदान आणि त्यानंतर होणाऱ्या बेकायदेशीर गर्भपाताच्या माध्यमातून संबंधित टोळीने कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची चर्चा आहे. या साखळीत अनेकांचे हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संबंधित डॉक्टरांचे नेटवर्क तपासण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि श्रीरामपूर पोलिसांनी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करत बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टर आणि एका एजंटला ताब्यात घेतले. त्यांचा दौंडमधील रॅकेटशी काय संबंध आहे का? याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणाबाबत आरोग्य विभाग आणि पोलिस अलर्ट मोडवर दिसत असताना दौंड तालुक्यातील आरोग्य विभाग मात्र अद्याप शांत का? असा सवाल न उपस्थित केला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याच्या चर्चा असताना स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराकडे आरोग्य विभाग आणखी किती दिवस डोळेझाक करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT