केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओ क्लिपमुळे आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेबाबत गेले काही दिवस दै. ‘पुढारी’ने आवाज उठवत पाठपुरावा केला होता. पोलिसांनी याची दखल घेत मोठी कारवाई केली.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव परिसरात गर्भलिंगनिदान चाचणीसंदर्भातील काही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. या व्हिडीओंची गंभीर दखल घेत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयिताला ताब्यात घेत अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून केडगाव आणि परिसरात गर्भलिंगनिदान चाचणीसंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. काही ठिकाणी गुप्तपणे चाचण्या सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत होत्या. आता व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड करीत आहेत.
संशयितांमध्ये खळबळ
आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित व्हिडीओंची तांत्रिक पडताळणी, त्यामागील नेटवर्क, संबंधित व्यक्ती आणि संभाव्य आर्थिक व्यवहार, यांचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या कारवाईमुळे परिसरात कार्यरत असलेल्या इतर संशयितांमध्येही खळबळ उडल्याचे बोलले जात आहे.