केडगाव: दौंड तालुक्यात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असताना, केडगाव परिसरातील एका खासगी डॉक्टरबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटक झालेल्या अण्णासाहेब गिरी याच्याशी संबंधित व्यक्ती आणि संपर्कांची चौकशी सुरू असताना, संबंधित डॉक्टरची भूमिका काय होती, याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अण्णासाहेब गिरी याची या डॉक्टरकडे वारंवार ये-जा असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून परिसरात सुरू होती. संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयाबाहेर अनेकदा चारचाकी वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य नागरिकांनी पाहिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या रुग्णालयात नेमके कोणत्या प्रकारचे उपचार अथवा वैद्यकीय सेवा दिल्या जात होत्या, याबाबत आता विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या डॉक्टरची चौकशी झाली आहे का?, संबंधित वैद्यकीय नोंदींची पडताळणी करण्यात आली आहे का?, तसेच या रुग्णालयातील व्यवहारांची तपास यंत्रणांनी सखोल छाननी केली आहे का?, असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा उलगडा होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण केडगाव परिसराचे लक्ष लागले आहे.
'त्या' डॉक्टरकडे होत असत गर्भपाताच्या शस्त्रक्रिया?
परिसरात अशीही चर्चा आहे की संबंधित डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या शस्त्रक्रिया होत असत. काही नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे. गर्भपातासंदर्भातील वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.