खोर: केडगाव-चौफुला चौक परिसर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध बनला आहे. येथे पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागते. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, कामगार आणि व्यापारीवर्गाला रोज त्रास सहन करावा लागतो. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे हा चौक ट्राफिकचा सापळाच झाल्याची टीका परिसरातून होत आहे. येथील वाहतूक कोंडीवर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या चौकात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यातच चौकातील सिग्नल व्यवस्था नीट काम करीत नाही. सिग्नलची वेळ व वाहतुकीचा वेग यात ताळमेळ नसल्याने वाहने अडकून पडतात. (Latest Pune News)
यासह येथे अनधिकृत थांबे व फेरीवाल्यांची गर्दी आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेले ट्रक, टेम्पो व हातगाड्या, यामुळे वाहनांना मार्ग कमी मिळतो. तसेच कालव्यावरील पूल अरुंद असल्याने येथे वाहने अडकतात. सुपा महामार्गावर कालव्यावरील अरुंद पुलाचा फटका वाहतुकीला बसतो. त्यातच काही वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत होण्यास हातभार लागत असल्याचे सांगितले जाते.
या वाहतूक कोंडीचा फटका परिसरातील व्यापारी, नागरिकांसह लांब पल्ल्याच्या औद्योगिक वाहतुकीस सहन करावा लागतो. त्यामुळे येथील कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
चौकात या उपाययोजनांची गरज
चौकाचा सिग्नल पद्धतीने पुनर्विचार करून वेळेचे योग्य नियोजन करावे
फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अनधिकृत वाहनथांबे हटवावेत
रस्त्यांचा विस्तार व वाहतूक नियोजनासाठी दुभाजक लावणे
वाहतूक पोलिसाची नियुक्ती असावी