साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी: कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवगार्साठी असल्याने या गटात इच्छुकांची संख्या मोठी आहे. या गटात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मंत्री,आमदार दिलीप वळसे पाटील यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग््रेास शरदचंद्र पवार गटाला येथून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही खरी लढत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्येच होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Latest Pune News)
सध्या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात वादळापूर्वीची शांतता अनुभवायला मिळत आहे. गेल्या चार वर्षांपासून या गटात विविध पक्षांचे नेते नवे गणित जुळविण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासमधील फुटीनंतर स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत. त्यातच या गटातील जिल्हा परिषद सदस्यपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या गटाबाहेरील दोन नेत्यांनी येथून उमेदवारी दाखल करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गुंतागुंतीचे झाले आहे.
दरम्यान, भाजपमधील एका स्थानिक नेत्याने जनसंपर्काच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ’जनता ठरवील तोच उमेदवार’ असा नारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासच्या अलीकडील मेळाव्यात दिलीप वळसे पाटील यांनी कोणीही स्वतःची उमेदवारी जाहीर करू नये,असे स्पष्टपणे सांगितले. दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांना बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असेल याविषयी मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात, या गटाची अंतिम उमेदवारी आंबेगाववरूनच जाहीर होणार आहे. तिकडून कोणते राजकीय समीकरण जुळविले जाईल यावर उमेदवार ठरणार आहे. काही स्थानिक नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतराचे पर्याय खुले ठेवले आहेत.