

पुणे: राज्याच्या ग्रामीण भागात असलेल्या वहिवाटीच्या रस्त्याबाबत (पाणंद) दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात जागेवर झाली आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी आता ’जिओ टँगिग’सह छायाचित्र आणि स्थळपाहणी पंचनामा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Latest Pune News)
पाणंद रस्त्यांबाबत अधिकान्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन करण्यात आला होता. नागरिकांचे जीवनमान सुकर करणे, या विषयावर अभ्यास करून कायद्यात आवश्यक ते बदल प्रस्तावित करणे, यासाठी हा अभ्यास गट आहे. अभ्यास गटाने नुकताच एक अहवाल राज्य शासनास सादर केला आहे.
या अभ्यास गटाने महसूल विभागातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत, अनेकदा अधिकारी हटविण्याचा किंवा रस्त्याची वहिवाट मोकळी करण्याचा आदेश देतात. मात्र, अंमलबजावणी होत नाही. यामुळे अर्जदारांवर पुन्हा तक्रार करण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर वहिवाटीच्या रस्त्यांच्या दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी पाहणी पंचनामा आणि जिओ रंग छायाचित्र वापरणे सर्व अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी काढला.